नागपूर येथे धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या विरोधात विहिंपचे आंदोलन !

अंनिसने धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना ३० लाखांचे आव्हान दिल्याचे प्रकरण

नागपूर – अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्‍वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दैवी दरबार आणि दिव्यशक्ती याला आक्षेप घेतल्याप्रकरणी २० जानेवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता संविधान चौक येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही विहिंपच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. हिंदुत्वनिष्ठांनी अंनिसच्या विरोधात जोरदार निदर्शने करून धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

१. नागपूर येथे ५ ते १३ जानेवारी या कालावधीत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांचा रामकथेवर आधारित कथा वाचनाचा कार्यक्रम झाला होता. तिथे त्यांनी त्यांचा दैवी दरबार भरवला होता.

२. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि नागपूर येथील जादूटोणा विरोधी जनजागृती प्रचार प्रसार समितीचे सहअध्यक्ष शाम मानव यांनी पोलिसांकडे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यासह ‘दिव्यशक्तीचे दावे सिद्ध करा आणि ३० लाख रुपये मिळवा !’ असे आव्हान दिले होते.

३. तथापी ‘महाराजांनी ते न स्वीकारताच नागपूर सोडले’, असे शाम मानव यांनी पत्रकार परिषदेत खोटे सांगितले होते. ते सातत्याने पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शाम मानव धीरेंद्रकृष्ण महाराज यांची अपर्कीती करत आहेत. यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे धर्म प्रसार प्रमुख राजकुमार शर्मा, भैय्या चौबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. ‘हिंदु महंतांचा अवमान सहन केला जाणार नाही. ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठांनी दिली.