सोलापूर येथे २४ जानेवारीला महर्षि मार्कंडेय जन्‍मोत्‍सव !

सोलापूर, २० जानेवारी (वार्ता.) – पद्मशाली समाजाचे आराध्‍यदैवत महर्षि मार्कंडेय जन्‍मोत्‍सव हा मध्‍यवर्ती महामंडळ, सोलापूरच्‍या वतीने प्रतिवर्षी साजरा करण्‍यात येतो. यंदाही महर्षि मार्कंडेय जन्‍मोत्‍सव माघ शुक्‍ल तृतीया (२४ जानेवारी) या दिवशी असून सर्वांनी मोठ्या उत्‍साहाने साजरा करावा, असे आवाहन महर्षि मार्कंडेय जन्‍मोत्‍सव मध्‍यवर्ती महामंडळाचे संस्‍थापक अध्‍यक्ष निरंजन बोद्दूल यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी महामंडळाचे सचिव अधिवक्‍ता अनिल वासम, सहसचिव नागेश सरगम, पुरुषोत्तम बोगा, अर्चना वडनाल, बाळकृष्‍ण मल्‍याळ यांच्‍यासह अन्‍य पदाधिकारी उपस्‍थित होते.

या वेळी बोद्दूल यांनी सांगितले की, २२ आणि २३ जानेवारी या दिवशी महर्षि मार्कंडेय यांची प्रतिमा, तसेच पद्मध्‍वज पार्क चौक येथे वितरीत केले जाणार आहेत. २२ जानेवारी या दिवशी सायंकाळी महर्षि मार्कंडेय यांच्‍या मूर्तीची प्रतिष्‍ठापना करून सुवासिनींच्‍या हस्‍ते हळद कुंकू कार्यक्रम होणार आहे, तर २४ जानेवारी या दिवशी पद्मध्‍वजारोहण, महर्षि मार्कंडेय यांची विधीवत् पूजा आणि धार्मिक विधी होणार आहेत.