डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्‍या परीक्षेत गोंधळ !

विद्यार्थ्‍यांना सभागृह तिकीट मिळालेच नाही !

संभाजीनगर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्‍या परीक्षेत सकाळी १० वाजता पेपर असूनही विद्यार्थ्‍यांना वेळेत सभागृह तिकीट न मिळाल्‍याने विद्यार्थ्‍यांचा गोंधळ उडाला असून त्‍यांच्‍यात संभ्रमाचे वातावरण आहे. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात बी.टेक्., बी.ए. आणि एल्.एल्.बी. सेमिस्‍टरची परीक्षा होत आहे. विद्यार्थ्‍यांना सभागृह तिकीट न मिळाल्‍याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्‍यांच्‍या रांगा लागल्‍या होत्‍या, तसेच सभागृह तिकीट नसल्‍याने कोणत्‍या वर्गात बसावे ? असा प्रश्‍न विद्यार्थ्‍यांना पडला होता. विद्यार्थ्‍यांचा गोंधळ पहाता विद्यापीठ प्रशासनाने पेपरवर पी.आर्.एन्. क्रमांक टाकण्‍याची सूचना करून सभागृह तिकीट नसतांना परीक्षा चालू केली.

संपादकीय भूमिका

असे प्रकार कसे होतात ? विद्यार्थ्‍यांना सभागृह तिकीट देण्‍याची समयमर्यादा किती होती आणि त्‍या वेळेत का दिले गेले नाही, याचा शोध घेऊन संबंधितांना शिक्षा होणे आवश्‍यक !