पंतप्रधान नरेंद्र मोदीलिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन !
मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – जे लोक चिंता करतात, त्यांचे जीवन तणावग्रस्त असते. जे काम आपण करत आहोत, ते भयमुक्त होऊन करायला हवे. ‘वॉरियर्स’ होणे म्हणजे आपण प्रथम भयमुक्त होणे होय. विद्यार्थ्यांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. १९ जानेवारी या दिवशी राजभवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या मराठी भाषेतील आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात राज्यपालांनी वरील आवाहन केले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल हे व्यासपिठावर उपस्थित होते.
या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ‘‘जगात भारताला पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. शस्त्रबळाने किंवा अन्य देशांच्या सीमा बळकावून नव्हे, तर प्रगतीच्या दृष्टीने भारताला जगात प्रथम देश निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.’’
विद्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – राज्यपाल कोश्यारी#GovernorKoshyari https://t.co/tDii1Wubli
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 19, 2023
या वेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय आणि महाविद्यालयीन सर्व अभ्यासक्रम मराठी भाषेत, तसेच कौशल्य विकासावर आधारित करण्यात येणार आहेत, अशी माहिती उपस्थितांना दिली. ‘शिक्षण विभागाकडून ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक सर्व शाळांतील वाचनालयांमध्ये देण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले. या वेळी विविध शाळांचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.