इयत्ता पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, तर ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही !

‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’चे सर्वेक्षण !

मुंबई – ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ने देशभरात केलेल्या ‘ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ या सर्वेक्षणात इयत्ता पाचवीतील ८० टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी करता आली नसल्याचे, तसेच ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित सोडवता आले नसल्याचे उघड झाले.

. इयत्ता पाचवीतील ४४ टक्के, तर आठवीतील २४ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या स्तराचे मराठी वाचन करता येत नाही. आठवीतील २.५ टक्के विद्यार्थ्यांना अक्षरेही ओळखता आली नाहीत.

. कोरोनापूर्वी झालेल्या (वर्ष २०१८) सर्वेक्षण अहवालाच्या तुलनेत किमान क्षमता विकसित झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी घटले आहे.

. इयत्ता पाचवीतील साधारण ४४ टक्के, तर इयत्ता आठवीतील २४ टक्के विद्यार्थी १० ते १२ सोप्या वाक्यांचा परिच्छेद वाचू शकले नाहीत.

. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येतून दोन अंकी संख्या वजा, उदा. ४१ वजा १३ असे करण्यास सांगितले असता केवळ १९.६ टक्के विद्यार्थ्यांनाच हे गणित सोडवता आले. वर्ष २०१८ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात असे गणित सोडवू शकणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३०.२ टक्के होते.

५. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येस एक अंकी संख्येने भागण्यास सांगण्यात आले, उदा. ५१९ भागिले ४; मात्र असे गणित सोडवू शकणार्‍या आठवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अवघे ३४.६ टक्के होते. यापूर्वीच्या सर्वेक्षणात हे प्रमाण ४०.७ टक्के इतके होते.

संपादकीय भुमिका

  • हे आहेत पाश्चात्त्य मेकॉले शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! कुठे विद्यार्थ्यांना सर्व विषयांत पारंगत करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणारी गुरुकुल पद्धत, तर कुठे प्राथमिक गणितही सोडवू न शकणारे विद्यार्थी निर्माण करणारी मेकॉले शिक्षणपद्धत ! हे चित्र भारतियांना लज्जास्पद !
  • वजाबाकी आणि भागाकार हेही न येणारे विद्यार्थी देशाचे भवितव्य कसे घडवणार ?
  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शासन कसे प्रयत्न करणार ?