युवक-युवतींनी आध्‍यात्मिक वारसा जोपासण्‍याची आवश्‍यकता ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे

सातारा, १७ जानेवारी (वार्ता.) – भ्रमणभाषच्‍या अतीउपयोगामुळे शहरासह ग्रामीण भागातही लव्‍ह जिहादसारखे प्रकार घडत आहेत. त्‍यामुळे युवती आणि माता-भगिनी असुरक्षित होऊ लागल्‍या आहेत. पालकांनी वेळीच सावध होऊन सामाजिक प्रसारमाध्‍यमांच्‍या आहारी गेलेल्‍या तरुणाईला वाचवायला हवे. यासाठी युवक-युवतींच्‍या अंगी आध्‍यात्मिक वारसा जोपासण्‍याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे यांनी केले. पाटण तालुक्‍यातील मल्‍हारपेठ येथे आयोजित कीर्तन सोहळ्‍यात त्‍या बोलत होत्‍या.

ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे पुढे म्‍हणाल्‍या की, सामाजिक प्रसारमाध्‍यमांमागे तरुणाई वहावत चालली आहे. काय योग्‍य नि काय अयोग्‍य, याचा साधा विचारही युवक-युवतींकडून होत नाही. समाजव्‍यवस्‍था बिघडत असतांना आपण भानावर असले पाहिजे. अवाजवी व्‍यय आणि चंगळवाद गावागावात पोचला असल्‍यामुळे गुन्‍हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. आध्‍यात्मिक संस्‍कृती जपण्‍यासाठी कीर्तनाच्‍या माध्‍यमातून समाजप्रबोधन झाले पाहिजे. आज माध्‍यमांतून समाजप्रबोधन होत असतांनाही त्‍याचा विनोद होऊ लागला आहे. या गोष्‍टी थांबवण्‍यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत.