पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ञांनी व्यक्त केली चिंता !

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार तज्ञांनी पाकिस्तानमधील  अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते पाकमध्ये अपहरण, बलपूर्वक धर्मातर आणि विवाह करण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हे रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.


तज्ञांनी म्हटले आहे की, अल्पसंख्यांकांवर होणारे आघात रोखण्यासाठी पक्षपात न करता कावाई केली पाहिजे. देशातील कायदे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सिद्धांत यांनुसार याविषयी पावले उचलणे आवश्यक आहे. आघातांना उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

आम्हाला हे ऐकून फार दुःख होते की, १३ वर्षांच्या मुलींचे घरातून अपहरण केले जाते. त्यानंतर तस्करीद्वारे त्यांना दुसर्‍या ठिकाणी पाठवले जाते. दुप्पट वयाच्या पुरुषाशी त्यांचे विवाह केले जातात, तसेच धर्मांतरही केले जाते. हे सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. आम्ही याविषयी चिंतित आहोत. अशांना न्यायही मिळत नसल्याने आम्ही निराश आहोत. अपहरण आणि धर्मांतर करणार्‍यांना स्थानिक सुरक्षादल आणि न्यायालय यांचा पाठिंबा आहे. पोलीस पीडितांच्या नातेवाइकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. गुन्हेही नोंद केले जात नाहीत.

अपहरण करून करण्यात आलेल्या विवाहाला ‘प्रेमविवाह’ ठरवले जाते. अपहरण करणारे पीडितेकडून खोट्या कागदपत्रांवर बलपूर्वक स्वाक्षरी करून घेतात आणि तिच्या इच्छेने विवाह झाल्याचे दाखवतात. त्यामुळे पोलीस त्यावर काहीच करत नाही. हे रोखण्यासाठी अधिकार्‍यांनी कायद्यांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे महिला आणि मुले यांच्या अधिकारांचे हनन होणार नाही आणि मानवाधिकारांचेही पालन होईल.

 (सौजन्य : Hindustan Times) 

संपादकीय भूमिका

  • नुसती चिंता व्यक्त करून काहीच उपयोग नाही. संयुक्त राष्ट्रांनी याविषयी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे, अन्यथा ‘संयुक्त राष्ट्रे केवळ बुजगावणे आहे’, हेच स्पष्ट होईल !
  • संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने पाकवर कारवाई करण्यासाठी भारताने या संघटनेवर दबाव आणला पाहिजे !