कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांनी शासनाची दिशाभूल करून शिष्‍यवृत्ती मिळवली !

उच्‍चस्‍तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ! – महेश शंकरपल्ली, माहिती अधिकार कार्यकर्ते यांची मागणी

संभाजीनगर – शासनाची दिशाभूल करून शिष्‍यवृत्ती मिळवलेल्‍या शाळांच्‍या सूचीमध्‍ये कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांच्‍या शाळांची नावे समाविष्‍ट आहेत. भ्रष्‍ट मंत्र्याने केवळ पैसा कमावण्‍यासाठी शाळा चालू केल्‍या आहेत. यातून शिक्षणाचा बाजार मांडला जात आहे. त्‍यामुळे सत्तार यांच्‍या शैक्षणिक संस्‍थांची उच्‍चस्‍तरीय चौकशी करून दोषी आढळल्‍यास सत्तार यांच्‍या शैक्षणिक संस्‍थांची मान्‍यता रहित करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी १४ जानेवारी या दिवशी केली आहे. महेश शंकरपल्ली यांनी गैरमार्गाने शिष्‍यवृत्ती मिळवलेल्‍या शाळांची सूचीही घोषित केली आहे. या सूचीतील अनेक शाळा या कृषीमंत्री अब्‍दुल सत्तार यांच्‍या आहेत, असाही आरोप त्‍यांनी केला आहे.


जिल्‍हा शिक्षण विभागाने संभाजीनगर जिल्‍ह्यातील काही शाळांना नोटीस दिली आहे. शासनाची दिशाभूल करून चुकीच्‍या पद्धतीने काही शाळांनी स्‍वतःच्‍या शाळेतील विद्यार्थ्‍यांना शिष्‍यवृत्ती मिळवून दिल्‍याचे समोर आले आहे. त्‍यामुळे ही शिष्‍यवृत्ती तात्‍काळ वसूल करून शासनाकडे जमा करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. सर्वांत अधिक विद्यार्थी म्‍हणजे २५३ विद्यार्थ्‍यांकडून घेतलेली शिष्‍यवृत्तीची रक्‍कम वसूल करण्‍याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.