(मेटाव्हर्स – एका आभासी तंत्रज्ञानाद्वारे ओळख सिद्ध करून त्याद्वारे समन्वय करण्याचे माध्यम म्हणजे मेटाव्हर्स)
पुणे – येथील राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालयाचे मेटाव्हर्स लवकरच साकारणार आहे. भारतातील पहिले मेटाव्हर्स व्यासपीठ असलेल्या भारतव्हर्स आणि संग्रहालय प्रशासन यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे मेटाव्हर्सच्या दुनियेत पाऊल टाकणारे हे देशातील पहिलेच संग्रहालय ठरले आहे. जगभरातील लोकांना भारतातील विशेष स्थळांचा घरबसल्या आभासी स्वरूपात अनुभव देत त्यांना या ठिकाणी प्रत्यक्षात भेट देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारतव्हर्सच्या वतीने मेटाव्हर्सची निर्मिती करण्यात येते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून केळकर वस्तूसंग्रहालयाचे मेटाव्हर्स सिद्ध होणार आहे. मोबाईल फोन, वेब ब्राउझर, हेड माउंटेड डिव्हाइस इत्यादी उपकरणांच्या माध्यमातून हा अनुभव घेणे शक्य होणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉ. श्रीकांत केळकर यांनी सिद्ध केलेली राजा दिनकर केळकर संग्रहालयाची त्रिमितीय आभासी सफर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘मेटाव्हर्स’ म्हणजे त्रिमितीय तंत्रज्ञानाच्या आधारे अनुभवता येणारे आभासी विश्व ! यामुळे त्या स्थळाची संपूर्ण माहिती, तेथील इतिहास इत्यादी गोष्टी अनुभवता येतात, तसेच आपण प्रत्यक्ष तेथे उपस्थित असल्याचा अनुभवही मिळतो.
सौजन्य : न्यूज पुणे