भारतमाता की जय संघाचा ‘म्हादई  बचाव’ आंदोलनास पूर्ण पाठिंबा

वर्ष २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये म्हादई प्रश्नावर केले होते लोकजागरण ! 


पणजी, १२ जानेवारी (पत्रक) – गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदी वाचवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि अन्य संघटना यांनी एकत्र येऊन पुकारलेल्या ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ या जनआंदोलनास ‘भारतमाता की जय संघ’ पूर्ण आणि सक्रीय पाठिंबा घोषित करत आहे, असे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

संघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतमाता की जय संघ आणि त्याच्या परिवार संघटना यांचे कार्यकर्ते यांनी प्रारंभीपासूनच या प्रश्नाचे गांभीर्य जाणून यापूर्वी वर्ष २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये म्हादई प्रश्नावर लोकजागरण करण्यासाठी पुढीलप्रमाणे विविध मोहिमा राबवलेल्या आहेत.

 (सौजन्य : Goan Reporter News)

१. २४ ते ३० जानेवारी २०१८ या कालावधीत, ‘गोवा सुरक्षा मंच’चे अध्यक्ष आनंद शिरोडकर आणि संयोजक उपाध्यक्ष गोविंद देव यांच्या नेतृत्वाखाली ‘म्हादई संपदा-रक्षा जलयात्रा’  म्हादई नदीच्या दोन्ही तिरावरील सत्तरी, डिचोली, फोंडा अन् तिसवाडी अशा ४ तालुक्यांतील ३० गावांत फिरवून तिथे आणि संपूर्ण यात्रामार्गात मिळून ३२ छोट्या मोठ्या जागरण सभा घेतल्या होत्या.

२. २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत, माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद भाटीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘म्हादई- बचाव’ या अराजकीय मंचाखाली सर्वश्री अरविंद भाटीकर, भारत माता की जय संघाचे प्रा. सुभाष वेलिंगकर, अवधूत कामत, आनंद शिरोडकर, आत्माराम गावकर आदी नेते आणि आप पक्षाच्या वतीने एल्विस गोम्स, प्रदीप पाडगावकर, सिद्धार्थ कारापूरकर आदी नेत्यांनी मिळून गोव्याच्या बाराही तालुक्यात एकूण १३ जागरण सभा घेतल्या अन् धरणे कार्यक्रम केले.

३. स्व. अवधूत कामत यांच्या नेतृत्वाखाली २ ते २९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत ‘म्हादईमाता पूजन अभियान’ राज्यपातळीवर  सर्व बाराही तालुक्यांत २२० गावी ३०७ कार्यक्रम यशस्वीपणे घेऊन एकूण २० सहस्र लोकांपर्यंत म्हादईचा विषय पोचवला.

भारतमाता की जय संघाचे कार्यकर्ते आणि या संघात नंतर सामावून घेण्यात आलेले विसर्जित गोवा सुरक्षा मंचचे कार्यकर्ते अशी संयुक्त शक्ती सध्या गोवा सरकारच्या नाकर्तेपणामुळे म्हादई प्रश्नाच्या निर्माण झालेल्या प्राणांतिक स्थितीबद्दल पुष्कळ व्यथित आणि अस्वस्थ आहेत.

आता जनतेलाच पेटून उठावे लागेल. राजकीय पक्ष अराजकीय संस्था आणि संघटना यांनी आपासांतील मतभेद बाजूला ठेवून संयुक्त सशक्त लढा उभारण्याची आवश्यकता आहे. ही जाणीव ठेवूनच या लढ्यास भारतमाता की जय संघ आपला सक्रीय पाठिंबा घोषित करत आहे.

♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦