सध्या थंडीचे दिवस चालू आहेत. उत्तर भारत तर थंडीने गारठला आहे. त्या क्षेत्राला अतीगारठ्याचा सामना करावा लागत आहे. यात काही जणांना प्राणास मुकावे लागले आहे. यंदा थंडीचे प्रमाणही अधिक आहे. थंडीच्या दिवसांत अंगावर उबदार कपडे, तसेच घोंगडीसारख्या उब देणार्या वस्तूंची नितांत आवश्यकता भासते. पदपथावर निवास असणार्या लोकांकडे या वस्तू असतातच असे नाही. त्यामुळे वातावरण थंड झाले की, त्यांना कडाक्याच्या थंडीला सामोरे जावे लागते. या वर्गाचा ऊन, पाऊस आणि थंडी या कालावधीत निसर्गाशी संघर्षच होत असतो. समाजसेवा करणार्या काही संस्था, तसेच वैयक्तिक स्तरावरही काही जण त्यांना थंडीच्या कालावधीत उबदार कपडे देतात. माणुसकी या नात्याने हा ओलावा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मोलाचा असतो.
‘थंडी चालेल; पण गरमी नको; कारण ती अंगाची लाही लाही करते’, असे म्हटले जाते. खरेतर अतीथंडी आणि अतीगरमी दोन्हीही सहन होत नाही, याचा अनुभव प्रत्येक जण घेतो. यांपासून बचाव करण्यासाठी प्रयत्नशील राहिले जाते. उदा. जिथे शक्य आहे तिथे शेकोटी करणे, उष्ण हवा देणार्या यंत्राचा उपयोग करणे. निसर्ग आपल्याला एका ऋतुमधून दुसर्या ऋतुमध्ये घेऊन पुढे सरकत रहातो. थंडीच्या दिवसांत पंखे, वातानुकूलित यंत्र यांना सक्तीची विश्रांती दिली जाते. उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्राचा उपयोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. या यंत्राच्या माध्यमातून उष्ण हवा बाहेर टाकली जात असल्याने बाहेरील वातावरण उष्ण होते. आधीच बाहेर उष्णता त्यात अधिक उष्णतेची भर पडते. यात निसर्गाचा विचार होतांना दिसत नाही; कारण धर्मशिक्षण नसल्यामुळे निसर्ग देवता, पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश) या संदर्भातील माहिती अत्यल्प लोकांना आहे.
‘एखादे वादळ अमुक राज्यात धडकणार’, याची पूर्वसूचना वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने मिळते. त्याला अनुसरून त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहिले जाते. ते योग्यच असते; परंतु यासमवेतच भगवंताची कृपा संपादन करून घेतल्यास त्याच्या अधीन असणारी पंचमहाभूते भक्ताला साहाय्य करतात. यासाठी सरकारने येणार्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निसर्गदेवता, पंचमहाभूते यांना शरण जाऊन नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज कसे रहायला हवे ? हेही जनतेला शिकवणे आवश्यक आहे.
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.