साधकांनी प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांच्या समवेत अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण काढणे, नामजपादी उपाय करणे आणि त्याचा आढावा देणे आवश्यक !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. काही दिवस नामजपादी उपाय केल्यावर त्रास अल्प होऊन उत्साही आणि आनंदी वाटणे

‘३.११.२०२२ या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी संतांच्या सत्संगात शरिरावरील अनिष्ट शक्तींचे त्रासदायक आवरण काढण्याची पद्धत आणि त्यानंतर नामजपादी उपाय शोधण्याचा प्रायोगिक भाग शिकवला अन् त्यांनी प्रतिदिन त्यानुसार प्रयत्न करण्यासाठी सुचवले. त्यांच्या प्रेरणेने माझ्याकडून ३ आठवडे प्रयत्न केले गेले. त्यामुळे माझ्यावरील अनिष्ट शक्तींचे आवरण अल्प होऊन आध्यात्मिक लाभ झाल्यामुळे मला आनंदी आणि उत्साही वाटू लागले.

२. काही कालावधीनंतर स्वभावदोषांमुळे नामजपादी उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नकारात्मकता येणे

त्यानंतर मात्र ‘मला काही आध्यात्मिक त्रास नाही आणि मी समष्टी सेवेमध्ये व्यस्त आहे’, असे वाटून मी १० दिवस नामजपादी उपाय केले नाहीत. यामागे माझे गृहीत धरणे, गांभीर्याचा अभाव, सवलत घेणे इत्यादी स्वभावदोष कारणीभूत होते. त्या कालावधीत माझ्या मनात नकारात्मक विचार येऊन मला अस्थिरता जाणवत होती. ‘त्याचे कारण शारीरिक आणि मानसिक असेल’, असे मी गृहीत धरून त्याकडे दुर्लक्ष केले.

पू. शिवाजी वटकर

३. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘तुमच्यावर पुष्कळ आवरण असून आध्यात्मिक त्रास आहे’, असे सांगून नामजपादी उपाय करण्यास सांगणे; त्यानुसार उपाय केल्यावर उत्साह आणि आनंद यांत वाढ होणे

३.१२.२०२२ या दिवशी मी संतांच्या सत्संगाला गेल्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर पुष्कळ आवरण आलेले आहे.’’ त्यांनी माझे छायाचित्र काढून दाखवले आणि प्रतिदिन आवरण काढून २ घंटे नामजपादी उपाय करण्यास सांगितले. त्यांच्या संकल्पामुळे मला प्रतिदिन सकाळी, दुपारी आणि रात्री असे एकूण २ घंटे आवरण काढून नामजपादी उपाय करता आले. एक आठवड्यानंतर, म्हणजे ९.१२.२०२२ या दिवशी असणार्‍या सत्संगाच्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादा यांनी माझे पुन्हा छायाचित्र काढले. त्यामध्ये ‘माझ्यावरील आवरण अल्प होऊन माझा आध्यात्मिक त्रास उणावला आहे’, असे माझ्या लक्षात आले. गुरुकृपेने सध्या प्रतिदिन माझ्याकडून गांभीर्याने नामजपादी उपाय होत आहेत.

४. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सुदृढ रहाण्यासाठी प्रतिदिन गांभीर्याने नामजपादी उपाय करणे आवश्यक असणे

सध्या पृथ्वीवर अनिष्ट शक्तींचे प्रचंड आवरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे साधना आणि सेवा करणार्‍या साधकांवर मोठ्या अनिष्ट शक्तींची प्रचंड आक्रमणे होत आहेत. साधकांनी ‘मला त्रास नाही किंवा काही होणार नाही’, असे गृहीत न धरता ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार नामजपादी उपायांना महत्त्व देणे’, ही काळाची आवश्यकता आहे’, असे मला वाटते. ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सुदृढ रहाण्यासाठी प्रतिदिन गांभीर्याने त्रासदायक आवरण काढणे, नामजपादी उपाय करणे अन् त्याचा आढावा देणे आवश्यक आहे’, हे मला गुरुकृपेने शिकायला मिळाले.

५. कृतज्ञता

नामजपादी उपायांचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात आणून देऊन ते प्रत्यक्ष करून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे समष्टी संत, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१२.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक