मॉस्को-गोवा विमानात बाँबची अफवा !

पणजी – रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोहून गोव्यात येणार्‍या ‘रशियन एअरलाइन्स’च्या विमानात बाँब पेरून ठेवल्याची माहिती ९ जानेवारी २०२३ ला रात्री मिळाली. ही माहिती मिळताच हे विमान तातडीने गुजरातमधील जामनगर येथे उतरवण्यात आले. यानंतर बाँब निकामी पथक, गुजरात पोलीस आणि अग्निशमन दल विमानतळावर पोचले. या विमानातील २४४ प्रवासी आणि कर्मचारी यांना उतरवण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षादलाच्या सैनिकांनी विमानाची झडती घेतली; मात्र झडतीत बाँब किंवा इतर संशयास्पद असे काहीही सापडले नाही. बाँबची बातमी ही अफवा ठरली.

१. ९ जानेवारी २०२३ या दिवशी दुपारी १२.३० वाजता मॉस्कोहून गोव्यासाठी विमानाने उड्डाण केले. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास विमानात बाँब असल्याची बातमी आली. तोपर्यंत विमानाने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. ही माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. त्यानंतर जवळच्या जामनगर विमानतळावर रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी विमान उतरवण्यात आले.

२. ‘गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोल’ला ‘ई मेल’द्वारे विमानात बाँब असल्याची माहिती देण्यात आली होती; मात्र हा ‘ई मेल’ कुणी आणि का पाठवला ? हे अद्याप कळू शकले नाही.

३. अधिकार्‍यांनी सांगितले की, संपूर्ण विमानाची, तसेच प्रवासी आणि विमानातील कर्मचारी यांची अनेक वेळा तपासणी करण्यात आली; मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. यानंतर थोड्यात वेळाने विमान पुन्हा गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाले.