सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीला धिराने सामोरे जाणारे ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी (वय ५९ वर्षे) !
१. ‘स्वादुपिंडात कर्करोगाची गाठ आहे’, असे निदान होणे
‘माझे वडील श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के आणि वय ५९ वर्षे) यांच्या स्वादुपिंडात गाठ आली होती. तपासणीनंतर ‘ती कर्करोगाची गाठ आहे’, असे निदान झाले. त्यानंतरच्या चाचणीत ‘या गाठीतील पेशींची वाढ हळूहळू होणार आहे. त्यामुळे ती शरिरात अन्यत्र पसरणारी नाही’, असे निदान झाले. त्यामुळे आम्हाला तिचे शस्त्रकर्म करण्यासाठीची आर्थिक आणि अन्य सिद्धता करण्यासाठी थोडा अवधी मिळाला.
२. वडिलांना कर्करोग झाल्याचे समजल्यावरही गुरुदेवांच्या कृपेने मनात भीती नसणे
‘बाबांच्या स्वादुपिंडामध्ये कर्करोगाची गाठ आहे’, असे निदान झाल्यावर गुरुकृपेने ‘यातून बाबा बरे होणार !’, अशी मनाला निश्चिती वाटत होती. त्यामुळे मी भावनाशील झाले नाही किंवा मला भीती वाटली नाही. बाबांची प्रत्येक तपासणी आणि तिचे अहवाल (‘रिपोर्ट्स’) येण्याची वाट पहाणे, हे आम्हाला परीक्षेप्रमाणेच होते; परंतु देवाने श्रद्धा डळमळीत होऊ दिली नाही.
३. ‘अहवाल’ पाहून सर्वच आधुनिक वैद्यांनी ‘तुझे बाबा बरे होण्याची शक्यता अल्प आहे’, असे सांगणे
‘सीटी स्कॅन’ (म्हणजे शरिरांतर्गत भागातील क्ष किरण कापचित्रे/छेदचित्रे मिळवणे) आणि ‘एम्.आर्.आय्.’ (म्हणजे चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ लहरींचा वापर करून शरिरांतर्गत भागातील कापचित्रे/छेदचित्रे मिळवणे) या अहवालांमध्ये बाबांच्या पोटातील गाठ पसरलेली दिसत होती. त्यामुळे जवळपास सर्वच आधुनिक वैद्यांनी ते अहवाल (रिपोर्ट्स) पाहून ‘‘बाबा बरे होण्याची शक्यता अल्प आहे’’, असे सांगितले होते.
४. कर्करोगाचे निदान झाल्यापासून शस्त्रकर्म होईपर्यंत वडिलांच्या मनाची स्थिती
अ. बाबा या कालावधीत पुष्कळ स्थिर होते.
आ. ते गुरुदेवांच्या अखंड अनुसंधानात होते.
इ. ते नामजप आणि मंत्रजप करत असल्याने त्यांना अन्य विचार करण्यासाठी वेळच नव्हता.
५. वडिलांचे शस्त्रकर्म झाल्यानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
५ अ. शस्त्रकर्म झाल्यावर ५ व्या दिवशी वडिलांना मोठी वांती होऊनही टाक्यांना धोका न होणे : शस्त्रकर्माच्या वेळी बाबांच्या पोटातील लहान आतड्याचा काही भाग, स्वादुपिंडाचा अर्धा भाग, संपूर्ण पित्ताशय आणि पित्ताशयातून येणारी नलिका इत्यादी अवयव काढून राहिलेल्या भागाची पुनर्रचना केली होती. बाबांना घातलेले टाकेसुद्धा नाजूक होते. त्यामुळे पुष्कळ काळजी घेणे आवश्यक होते. त्यातच शस्त्रकर्म झाल्यावर ५ व्या दिवशी त्यांना मोठी वांती (उलटी) झाली; परंतु गुरुकृपेमुळे पोटातील टाक्यांना काही धोका झाला नाही.
५ आ. शस्त्रकर्म झाल्यावर बाबांना हालचाल करणेही कठीण होणे आणि त्यांनी नामस्मरण, मंत्रोपाय अन् गुरुदेवांचे स्मरण करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे : शस्त्रकर्मानंतर बाबांच्या शरिरात वेगवेगळ्या नळ्या घातल्या होत्या. त्यातून वेगवेगळे स्राव बाहेर येत असत. त्यामुळे त्यांना हालचाल करणेही कठीण जात होते. ते सर्व सहन करत होते. त्यांना या सर्वांचा पुष्कळ त्रास व्हायचा, तरीही ते नामस्मरण, मंत्रोपाय आणि गुरुदेवांचे स्मरण करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करायचे.
५ इ. ‘परात्पर गुरु पांडे महाराज बाबांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत आहेत’, असे जाणवणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या आवाजातील मंत्रजप भ्रमणभाषवर लावून आम्ही सर्व जण ते मंत्रजप करत होतो. त्या वेळी ‘परात्पर गुरु पांडे महाराज तेथे बसून मंत्र म्हणून बाबांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत आहेत’, असे आम्हा सर्वांनाच जाणवत होते.
५ ई. वडिलांची सहनशीलता
१. शस्त्रकर्म झाल्यावर पुढील दोन दिवस बाबांना पाणीही द्यायचे नव्हते. आरंभीचे दोन दिवस बाबा पाणी पिण्यासाठी पुष्कळ तळमळले; परंतु ‘आपल्याला पाणी प्यायचेच नाही’, हे त्यांनी स्वीकारले आणि त्या दोन दिवसांनंतर त्यांनी स्वतःहून पाणी मागितले नाही.
२. त्यांना पुष्कळ शारीरिक वेदना होत होत्या, तरीही ते त्या वेदना सहन करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करायचे. वेदनाशामक इंजेक्शन देणारे आधुनिक वैद्य प्रतिदिन बाबांना म्हणायचे, ‘‘तुम्हाला किती वेदना होत आहेत, ते तुम्ही सांगा. तुम्ही सहन करू नका.’’
३. शस्त्रकर्मानंतर १५ दिवसांत बाबांचे वजन २२ किलोंनी घटले. त्यामुळे त्यांना पुष्कळ थकवा आणि अशक्तपणा असायचा. त्यांना रात्रभर झोप येत नसे. दिवसा त्यांना सलग अर्धा घंटाच झोप लागायची. उर्वरित वेळी ते जागेच असायचे. असे बाबांनी १५ दिवस काढले.
५ उ. बाबांचा परात्पर गुरुदेवांप्रती भाव
१. बाबांच्या मनात सतत ‘गुरुदेवांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले ! ते आपल्यासाठी किती करत आहेत !’, हाच विचार असायचा. त्यांना या विचाराने कृतज्ञता वाटून त्यांची सतत भावजागृती व्हायची.
२. ‘आधुनिक वैद्य प.पू. डॉक्टरच आहेत आणि सेवा करणार्या परिचारिका गोपी आहेत’, असाच बाबांचा भाव असायचा.
या स्थितीत बाबांमधील ‘सहनशक्ती, इतरांचा विचार करणे, प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य, सर्वांप्रती असलेला कृतज्ञताभाव आणि गुरूंवर अपार श्रद्धा’, हे गुण माझ्या लक्षात आले.’
– कु. श्वेता पट्टणशेट्टी (श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांची धाकटी मुलगी), नगर, महाराष्ट्र. (९.९.२०२१)
प्रेमळ आणि रुग्णांचे आधारस्तंभ असलेले शल्य विशारद आधुनिक वैद्य गजानन वाघोलीकर !
मी स्वत: डॉक्टर असून ‘शल्य विशारद गजानन वाघोलीकर यांच्यासारखे डॉक्टर असतात’, हे त्यांच्याबद्दलचा पुढील लेख वाचून माझ्या लक्षात आले. त्यांनी साधनेत चांगली प्रगती केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२७.९.२०२२) |
‘केवळ भगवंताच्या कृपेने नगर येथील साधक आधुनिक वैद्य रवींद्र भोसले यांच्या माध्यमातून माझी पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कर्करोग विभागातील शल्य विशारद गजानन वाघोलीकर यांची भेट झाली. मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. आदर्श आधुनिक वैद्य गजानन वाघोलीकर !
आधुनिक वैद्य गजानन वाघोलीकर यांच्या मार्गदर्शनानुसार बाबांच्या सर्व तपासण्या आणि उपचार झाले. त्यांनीच बाबांचे शस्त्रकर्म केले. ‘आधुनिक वैद्य गजानन वाघोलीकर हे रुग्णालयातील सर्व आधुनिक वैद्यांमध्ये आदर्श आहेत’, असे आम्हाला जाणवले. त्यांच्यात साधकत्व आहे. ते सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सलग शस्त्रकर्म करतात. ते अधूनमधून रुग्णांनाही भेटतात.
२. त्यांचे रहाणीमान अत्यंत साधे असून त्यांच्या बोलण्यात पुष्कळ मृदुता आणि प्रेम आहे.
३. सतत कार्यरत
त्यांनी बाबांचे शस्त्रकर्म सलग ११ घंटे केले. बाबांचे शस्त्रकर्म चालू करण्यापूर्वी त्यांनी ३ घंटे एक शस्त्रकर्म केले होते. सतत कार्यरत राहूनही त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच थकवा किंवा ताण नसतो.
४. रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांना आधार देणे
४ अ. शस्त्रकर्माचा व्यय अल्प होण्यासाठी प्रयत्न करणे : मी बाबांच्या उपचारांसाठी त्यांना प्रथम भेटल्यावर त्यांनी मला पुष्कळ आधार दिला. त्यांनी बाबांच्या शस्त्रकर्माचा व्यय अल्प होण्यासाठी प्रयत्न केला. ते नामांकित शल्यविशारद (सर्जन) असूनही त्यांना हे सर्व करण्यात कसलाच संकोच वाटत नव्हता किंवा त्यांच्यात कर्तेपणा नव्हता.
४ आ. साधिकेला शस्त्रकर्माविषयी काळजी न करण्यास सांगून वेळेत जेवायला सांगणे : शस्त्रकर्म करत असतांना मध्येच ते ‘‘शस्त्रकर्म व्यवस्थित चालू आहे’’, असे सहकार्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवत होते. एकदा मध्येच बाहेर येऊन त्यांनी मला आणि बहिणीला सांगितले, ‘‘काळजी न करता वेळेत जेवून घ्या’’; मात्र ते स्वतः आणि त्यांचे सहकारी बाबांचे शस्त्रकर्म झाल्यानंतर आमच्याशी बोलून झाल्यावर रात्री ११ वाजता जेवायला गेले. आम्ही त्यांना जेवणाविषयी विचारल्यावर त्यांनी पुन्हा आमचीच विचारपूस केली.
४ इ. रुग्णांची आपुलकीने चौकशी करणे : बाबांच्या शस्त्रकर्मानंतरही ते प्रतिदिन बाबांना भेटायला यायचे. ते कधीकधी रात्री १२.३० वाजताही बाबांना भेटून जायचे. ते रुग्णांची सर्व लहान-सहान गार्हाणीही ऐकून घ्यायचे.
५. अल्प अहं
त्यांच्या चेहर्यावर किंवा त्यांच्या बोलण्यातून कधी अहंचा लवलेशही जाणवला नाही.
६. कृतज्ञता
आम्हाला या आधुनिक वैद्यांच्या रूपात परात्पर गुरुदेवच भेटले होते. आम्हाला असे आधुनिक वैद्य मिळवून दिल्यावद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी आणि शल्य विशारद गजानन वाघोलीकर यांच्याप्रती जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी अल्पच आहे.’
– कु. श्वेता पट्टणशेट्टी (श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांची धाकटी मुलगी), नगर, महाराष्ट्र. (९.९.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |