शस्‍त्रकर्म करण्‍यापूर्वी आणि शस्‍त्रकर्माच्‍या वेळी देवद आश्रमातील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६७ वर्षे) यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

 ‘वर्ष २०१८ पासून मला ‘हैड्रोसेल’चा (पुरुषांच्‍या वृषणात पाणी साठण्‍याचा) त्रास आहे. याचे शस्‍त्रकर्म सोपे आणि लहान आहे; पण मला हृदयविकाराचा त्रास असल्‍याने ‘हे शस्‍त्रकर्म तुमच्‍यासाठी धोकादायक आहे’, असे पनवेल येथील एका आधुनिक वैद्यांनी सांगितले. मी आयुर्वेदिय उपचार चालू ठेवले. नंतर मला वावरतांना अवघड वाटू लागल्‍याने मी आपत्‍काळापूर्वी शस्‍त्रक्रर्म करण्‍याचा निर्णय घेतला.

श्री. बाळासाहेब विभूते

१. पुणे येथे रुग्‍णालयात जाण्‍यापूर्वी पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी अर्धा घंटा माझ्‍यासाठी नामजपादी उपाय केले, तसेच प.पू. पांडे महाराज यांचे मंत्रही दिले. त्‍यानंतर मला शस्‍त्रकर्माविषयी वाटत असलेली भीती नाहीशी झाली.

२. रुग्‍णालयात साधकांचे लाभलेले साहाय्‍य

२ अ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेल्‍या पुणे येथील साधिका आधुनिक वैद्या ज्‍योती काळे यांचे मोलाचे साहाय्‍य लाभणे : २७.१.२०२१ या दिवशी मला पुणे येथील नवले रुग्‍णालयात भरती करून घेतले. तेथे आधुनिक वैद्या  ज्‍योती काळे यांचे मला मोलाचे साहाय्‍य लाभले. त्‍या मोठ्या पदावर कार्यरत असूनही मला नियमितपणे भेटायला यायच्‍या. त्‍यांच्‍यात अहं अल्‍प आहे. त्‍यांच्‍यात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ भाव आहे. त्‍यांच्‍या हाताखाली कार्यरत असणारे आधुनिक वैद्य, परिचारिका यांच्‍याशीही त्‍या एका लयीत आणि शांतपणे बोलत असत. हे सर्व पाहून ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर आमच्‍यासाठी किती करतात !’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

२ आ. पुणे येथील साधकांनी रुग्‍णालयात वेळेत गरम महाप्रसाद, पाणी इत्‍यादी देणे आणि त्‍यातून त्‍यांचा सेवाभाव जाणवणे : मी रुग्‍णालयात भरती झाल्‍यावर मला पुण्‍यातील साधकांकडून दोन्‍ही वेळा सांगितलेल्‍या वेळेत गरम महाप्रसाद मिळत असे. ते पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या बाटल्‍याही देत होते. ते ‘जेवणात काही अल्‍प-अधिक होत आहे का ?’, अशीही विचारपूस करत. तेव्‍हा मला आश्रमातील कार्यपद्धतीनुसार वागण्‍याचे बाळकडू साधकांच्‍या या सेवेतून जाणवले. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी भावी हिंदु राष्‍ट्रासाठी साधकांची परिपूर्ण सिद्धता करून घेतल्‍याची प्रचीती मला आली. ‘मी रुग्‍णालयात असूनही आश्रमातच महाप्रसाद ग्रहण करत आहे’, असे मला वाटायचेे. रक्‍ताच्‍या नात्‍यातील मंडळींनाही जमणार नाहीत, अशा साधकांच्‍या या कृती पाहून सनातनच्‍या कृपाछत्राखाली असल्‍याचे महत्त्व अधोरेखित होऊन माझी भावजागृती झाली.

३. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक जणांच्‍या माध्‍यमातून पदोपदी काळजी घेतल्‍याचे जाणवणे

१.२.२०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता मला शस्‍त्रकर्मासाठी आत घेतले. त्‍या वेळी ज्‍योतीताई उपस्‍थित होत्‍या. त्‍यांनी मला प्रेमाने आणि आपुलकीने सांगितले, ‘‘घाबरू नका. सर्व व्‍यवस्‍थित होईल.’’ रुग्‍णालयातील आधुनिक वैद्य मला म्‍हणाले, ‘‘तुमचे इष्‍ट दैवत किंवा गुरु यांचे स्‍मरण करत शांतपणे नामजप करत रहा.’’ मी घाबरट आहे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी अनेक व्‍यक्‍तींच्‍या मनात माझ्‍याशी बोलण्‍याचे विचार घालून मला ‘निर्भय रहा. भिऊ नकोस. मी तुझ्‍या पाठीशी आहे’, याची ग्‍वाही दिली. हे आठवून माझी भावजागृती झाली. तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझ्‍या जीवनात नसते, तर काय झाले असते ? माझी पदोपदी एवढी काळजी कोणी घेतली असती ?’, असे विचार माझ्‍या मनात आले. १२.३० वाजता शस्‍त्रकर्म झाल्‍यावर ज्‍योतीताईंनी माझ्‍या डोक्‍यावरून हात फिरवून शस्‍त्रकर्म चांगले झाल्‍याचे सांगितले. तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर आपल्‍यासाठी किती करतात !’, या विचाराने कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.

४. रुग्‍णालयातील आधुनिक वैद्यांना साधकातील वेगळेपणा जाणवणे

एकदा शस्‍त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य बहार कुलकर्णी रुग्‍णालयात ‘राऊंड’ला आले होते. मी त्‍यांना नमस्‍कार केला. त्‍या वेळी ते म्‍हणाले, ‘‘तुमच्‍याकडे पाहून तुम्‍ही साधक आहात’, असे वाटते.’’ मी म्‍हणालो, ‘‘मी सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करतो.’’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘तरीच मला तसे जाणवले.’’

५. मुलाने आईसारखी सेवा करणे

माझा मुलगा उमाकांत माझ्‍यासमवेत रुग्‍णालयात रहात होता. त्‍याने माझी अगदी आईसारखी सेवा केली. रात्रीही तो माझी हालचाल जाणवल्‍यास उठून बसायचा. सभोवतालच्‍या रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना त्‍याचे फार कौतुक वाटत होते आणि त्‍यानंतर त्‍यांनीही त्‍यांच्‍या रुग्‍णांची तशीच सेवा करणे चालू केले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी आणि आधुनिक वैद्या ज्‍योती काळे अन् साधक यांच्‍याप्रती मी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. बाळासाहेब विभूते (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.३.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक