१. सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप करू लागल्यावर ‘मोठा खजिना सापडला आहे’, असे वाटणे आणि नंतर आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणे
‘वर्ष २००६ मध्ये मी साधनेला आरंभ केला. त्या वेळी सत्संगात आम्हाला कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करायला सांगितले होते. मी नामजप करायला आरंभ केल्यावर ‘मला खजिना सापडला आहे’, असे वाटत होते. त्या वेळी मला झोपेतून जाग आली, तरी माझा नामजप चालू असायचा. त्या वेळी मला मनातून पुष्कळ आनंद होत असे. नामजप करायला लागल्यावर आमच्या आर्थिक परिस्थितीतही सुधारणा झाली.
२. गुरुपौर्णिमेच्या वेळी प्रसारसेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, असे जाणवणे
गुरुपौर्णिमेच्या वेळी प्रसाराची सेवा करतांना माझे परात्पर गुरुदेवांशी अनुसंधान असायचे. त्या वेळी माझ्याकडून त्यांना तळमळीने प्रार्थना व्हायची. मी कचर्याच्या ढिगाजवळून गेले, तरी मला सुगंध यायचा. त्या वेळी सूक्ष्मातून ‘परात्पर गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटायचे.
३. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर भावावस्था अनुभवणे
१८.७.२००७ या दिवशी सकाळी एका साधकाच्या घरी मानसपूजा केल्यावर मला भावावस्था अनुभवता आली. ‘त्या रात्री गुरुपौर्णिमा आहे’, असे मला वाटत होते. वर्ष २००८ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला ‘कोणता तरी सण आहे’, असे वाटून उत्साही वाटत होते आणि मी दिवसभर भावावस्था अनुभवत होते.
४. गुरुपौर्णिमेच्या रात्री घरात चंदनाचा सुगंध येणे आणि साधकांची परात्पर गुरुदेवांशी भेट झाल्यावर त्यांनी ‘‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुणाला चंदनाचा सुगंध आला का ?’’, असे विचारणे
गुरुपौर्णिमेच्या रात्री माझी मुले घरी अभ्यास करत होती आणि मी लिखाण करत होते. त्या वेळी अकस्मात् मला चंदनाचा सुगंध येऊ लागला. ‘तो दैवी सुगंध कुठून येत आहे ?’, हेे शोधण्याचा मी प्रयत्न केला. हा सुगंध आल्यावर मला ‘काय करू अन् काय नको ?’, असे झाले. त्या वेळी माझी भावजागृती होऊन मला पुष्कळ आनंद झाला.
गुरुपौर्णिमा झाल्यावर आमच्या केंद्रातील साधक परात्पर गुरुदेवांना भेटण्यासाठी मुंबईला सेवाकेंद्रात गेले होते. भेटीच्या वेळी परात्पर गुरुदेवांनी साधकांना विचारले, ‘‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुणाला चंदनाचा सुगंध आला का ?’’ त्या वेळी सर्व साधकांनी सांगितले, ‘‘खांदा कॉलनीतील एका साधिकेला चंदनाचा सुगंध आला होता.’’
५. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरुदेवांनी पूर्वी वास्तव्य केलेल्या खोलीत नामजप करतांना माझ्या साडीवर दैवी कण आढळले होते.
‘देवा, हा आनंद दिल्याविषयी मी कोटीशः कृतज्ञ आहे. आमच्यावर अशीच कृपा राहू दे’, अशी प्रार्थना करते.’
– सौ. सुवर्णा नंदकुमार साळुंखे, खांदा कॉलनी, पनवेल. (१५.५.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |