(म्हणे) ‘भाजपशासित राज्यांत झालेला लव्ह जिहादचा कायदा घटनाविरोधी !’

‘लव्ह जिहाद’ची पाठराखण करणारे एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे विधान !

एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी

नाशिक – भारताची राज्यघटना प्रत्येक प्रौढ नागरिकाला त्याच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा अधिकार देते. जर कुणी आपल्या पसंतीनुसार जोडीदार निवडून लग्न करत असेल, तर त्यावर दुसर्‍यांना त्रास होण्याचे काय कारण ? भाजपशासित राज्यात जिथे जिथे लव्ह जिहादचा कायदा बनला, तो घटनाविरोधी आहे. भाजपाला प्रेमाचा एवढा राग का येतो ? प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग द्यायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत आहेत, त्यावर काही बोलले जात नाही. महाराष्ट्रातील युवकांचे ज्वलंत प्रश्‍न आहेत, त्यावर बोलायला कुणी सिद्ध नाही, असे फुकाचे वक्तव्य एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले. (राष्ट्रासमोरील ‘लव्ह जिहाद’ या ज्वलंत समस्येकडून सर्वांचे लक्ष वळवले जावे, यासाठी अन्य प्रश्‍न मांडण्याचा ओवैसींचा केविलवाणा प्रयत्न ! – संपादक)

ते पुढे म्हणाले…

१. ‘लव्ह’ आणि ‘जिहाद’ या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. (लोकांची दिशाभूल करणारे विधान ! – संपादक) तलवार उचलून कुणाला तरी मारणे याला लोक ‘जिहाद’ समजतात, हेही चूक आहे. (गेल्या काही मासांमध्ये धर्मांधांच्या कारवाया पहाता त्यात ‘जिहाद’ कसा करण्यात आला, हे सर्वश्रुत आहे. असे असतांना ‘जिहाद’ला सौम्य आणि मवाळ करण्याचा ओवैसी यांचा प्रयत्न हिंदू पूर्णतः ओळखून आहेत ! – संपादक)

२. जर कुणी पैसे देऊन धर्म परिवर्तन करायला लावत असेल, तर त्याच्या विरोधात आधीच सर्वोच्च न्यायालयाने २५ वर्षांपूर्वी निकाल दिलेला आहे; पण जर कुणी स्वेच्छेने धर्मपरिवर्तन करत असेल, तर त्याच्यामध्ये आडकाठी आणणारे तुम्ही कोण ? (सध्याच्या काळात स्वेच्छेने धर्मपरिवर्तन करणार्‍यांपेक्षा बळजोरीने धर्मांतर घडवून आणण्याची  संख्या अधिक प्रमाणात आहेे. हे उघड सत्य आहे. याविषयीची आकडेवारी सांगणारे विविध अहवालही प्रसिद्ध झाले आहेत. याविषयी ओवैसी महाशयांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)

३. कुणी ख्रिस्ती किंवा मुसलमान स्वतःचा धर्म पालटतो, तेव्हा त्याला कोणतीही अडचण नसते. ज्याला जे करायचे, ते करू द्यायला हवे. त्यांचा तो कायदेशीर अधिकार आहे. (ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्याकडून धर्म पालटला जाण्याच्या प्रमाणापेक्षा हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर केले जाण्यात प्रमाण अधिक आहे. त्याविषयी चकार शब्द न काढता ख्रिस्ती किंवा मुसलमान यांची बाजू घेणारे धर्मांध ओवैसी ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • हिंदु नावे धारण करून हिंदु मुलींना फसवणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यांचे धर्मांतर करणे, हे कोणत्या घटनेत बसते ?
  • ओवैसी यांना राज्यघटनेविषयी एवढाच आदर असेल, त्यांनी मुसलमानांकडून घडवून आणलेल्या दंगली आदींविषयी बोलावे आणि त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा !