२९.३.२०२१ या दिवशी श्रीमती नलिनी बाळकृष्ण विभांडिक यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचा मुलगा श्री. जगदीश विभांडिक आणि त्यांची मुलगी संगीता विभांडिक यांना त्यांच्या निधनापूर्वी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्री. जगदीश विभांडिक (मधला मुलगा), ठाणे
१ अ. ‘आईच्या मनात नेहमी सत्चे विचार असायचे. तिच्या समवेत बोलतांना ती सतत साधनेचेच दृष्टीकोन देत असे.
१ आ. तिला मायेतील आणि व्यावहारिक जीवनात जराही रस नव्हता.
१ इ. तिच्या प्रत्येक कृतीत ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशी त्रिसूत्री सदैव बघायला मिळत असे.
१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : आई नेहमी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहात असे. ती प्रत्येक कृती त्यांचे स्मरण करूनच करत असे. ती प्रत्येक कृती करतांना प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करत असे. ती संपूर्ण कृती भावपूर्ण करत असे.’
२. संगीता विभांडिक (धाकटी मुलगी), नाशिक
२ अ. प्रेमभाव : ‘आई सर्व साधकांची आणि इमारतीमधील (बिल्डिंगमधील) सर्वांची प्रेमाने चौकशी करत असे. आईचे निधन झाल्यानंतर इमारतीमधील सर्वांना पुष्कळ वाईट वाटले. ते सर्वजण म्हणत होते, ‘‘आजी गेल्याने आपली इमारत रिकामी झाली.’’
२ आ. परेच्छेने वागणे : आईची स्वतःची अशी कोणतीच इच्छा नसायची. ती प्रत्येक कृती परेच्छेने करायची.
२ इ. सात्त्विक वेशभूषा : रुग्णाईत असतांना आईला साडी नेसण्यासाठी उभे रहाण्याची शक्ती नव्हती, तरीही ती साडी नेसायची. तिला सात्त्विक वेशभूषा करायला आवडायची. रुग्णालयात जातांना मी तिला सांगितले; म्हणून तिने केवळ एकदा पोषाख (सलवार-कमीज) घातला.
२ ई. स्वावलंबी : रुग्णाईत असतांना आईची शारीरिक क्षमता अतिशय न्यून झाली होती, तरीही ती स्वतःची सर्व कामे स्वतःच करत असे. ताप उतरल्यावर थोडे बरे वाटल्यानंतर ती घरातील कामांमध्ये मला साहाय्य करत असे.
२ उ. सहनशक्ती : आईला ताप आल्यानंतर तिच्या पाठीत आणि पायांमध्ये पुष्कळ वेदना होत होत्या. आईला बसताही येत नव्हते. ती त्या वेदना शांतपणे आणि आनंदाने सहन करत असे.
२ ऊ. त्याग : आईने घरातील सर्व वस्तू आश्रमात अर्पण दिल्या होत्या. आईने आयुष्यात कोणतीही कृती स्वतःसाठी केली नाही. आई आयुष्यभर केवळ दुसर्यांसाठीच जगली.
२ ए. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : आई नियमितपणे आणि न चुकता स्वतःच्या व्यष्टी साधनेचा आढावा आढावासेवकांना देत असे. प्रारंभी आई तिचा व्यष्टी साधनेचा आढावा लेखी स्वरूपात देत असे. नंतर आईला भ्रमणभाष हाताळता येत नसल्याने मी आईचा आढावा भ्रमणभाषवर लिहून पाठवत असे. आईचा आढावा भ्रमणभाषवर लिहितांना (टाईप करतांना) मला त्यातून पुष्कळ चैतन्य आणि आनंद मिळायचे. एक दिवस मला वेळ न मिळाल्याने आईचा आढावा पाठवायचा राहिला. त्यामुळे आईला रात्रभर झोप आली नाही. ती तिची व्यष्टी साधना तळमळीने पूर्ण करायची. मृत्यूच्या दिवशीही ती मला विचारत होती, ‘‘मी व्यष्टी आढावा देऊ का ?’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘तुझी प्रकृती बरी नसल्याने दिला नाही, तरी चालेल.’’
२ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा : तिची परम पूज्य गुरुदेवांवर नितांत श्रद्धा होती. ती सतत त्यांच्या स्मरणातच रहात असे. तिचा सतत नामजप चालू असे.
२ ओ. निधनाच्या वेळी सहज मृत्यू येणे : कोरोना झालेल्या रुग्णांना मृत्यूसमयी पुष्कळ त्रास होतो; परंतु आईला तसा काहीच त्रास झाला नाही. चालता बोलता हृदयविकाराचा झटका येऊन आईचा मृत्यू सहजच झाला.
२ औ. निधनानंतर जाणवलेले पालट
१. आईचे निधन झाल्यानंतर संपूर्ण रुग्णालयात पुष्कळ प्रकाश निर्माण झाल्यासारखा वाटत होता.
२. संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.
३. रुग्णालय पुष्कळ मोठे असल्याप्रमाणे वाटत होते.
४. माझे अंत:करण स्थिर झाले होते.
५. मृत्यूनंतरही आईचा चेहरा लहान मुलाप्रमाणे टवटवीत, तेजस्वी, सात्त्विक आणि आनंदी दिसत होता.
६. तिच्या त्वचेला पुष्कळ चकाकी येऊन त्वचा मुलायम झाली होती.
३. एकटीला स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार करावे लागणार असणे; परंतु गुरुकृपेने आईचा मृतदेह मिळण्याच्या वेळीच भाऊ पोचून अंत्यसंस्कार निर्विघ्नपणे पार पडणे
आईचा मृत्यू झाला, त्या वेळी मी रुग्णालयात एकटीच होते. ताई (सौ. सुनीता प्रकाश थोरात [वय ५७ वर्षे]) आणि दादा (श्री. जगदीश बाळकृष्ण विभांडिक [वय ४७ वर्षे]) ठाण्याला होते. त्यांना यायला वेळ लागणार होता; परंतु आईला कोरोना झाला असल्याने आधुनिक वैद्य अधिक वेळ आईचा देह रुग्णालयात ठेवण्यास सिद्ध नव्हते. मला एकटीला स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार करावे लागणार होते; परंतु गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने रात्री २ वाजता मला आईचा देह रुग्णालयातून दिला. त्याच क्षणाला ताई आणि दादा ठाण्याहून नाशिकला रुग्णालयात पोचले. दादाच्या हातून आईच्या देहावर अंत्यसंस्कार निर्विघ्नपणे पार पडले.
४. अंत्यसंस्काराच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. आईच्या देहावर अंत्यसंस्कार करतांना स्मशानातही पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
आ. रुग्णवाहिकेचा (ॲम्ब्युलन्सचा) चालक आणि स्मशानातील कर्मचारी म्हणाले, ‘‘आम्हाला अंत्यसंस्कार होत असतांना चांगले वाटत होते. आज पहिल्यांदा आम्हाला इतके चांगले वाटले.’’
इ. त्या काळात दळणवळण बंदी असूनही गंगेवर आईचे सर्व विधी सात्त्विक वातावरणात निर्विघ्नपणे पार पडले.
आम्हा भावंडांसाठी आई गेल्याचे दुःख पुष्कळ होते; परंतु केवळ साधकांच्या सहवासामुळे, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या कृपेमुळे आम्ही यातून सावरलो. या कठीण प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले सतत समवेत असल्याची जाणीव होत होती. त्यांनी आईकडून साधना करून घेऊन तिला जन्ममृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
‘हे गुरुमाऊली, आमच्यातही आईप्रमाणे दिव्य गुण निर्माण होण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न करून घ्यावेत’, ही तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे. कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |