जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांच्या १८ अतिरिक्त तुकड्या नियुक्त करणार !

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून नागरिकांच्या वाढत्या हत्यांच्या पार्श्‍वभूमीवर तेथे केंद्रीय राखीवर पोलीस दलाच्या सैनिकांच्या १८ अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राजौरी येथे अलीकडेच जिहादी आतंकवाद्यांनी २ ठिकाणी आक्रमणे केली होती. त्यात हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या होत्या.

१. या १८ तुकड्यांमध्ये १ सहस्र ८०० सैनिकांचा समावेश असणार आहे. या सैनिकांना पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात येणार आहे.

२. राजौरी शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर असणार्‍या डांगरी गावामध्ये अत्याधुनिक स्फोटकांचा साठा सापडला होता. राज्यात अन्य ठिकाणीही आतंकवादी आक्रमणे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

जिहादी आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असणार्‍या पाकला जोपर्यंत नष्ट करणार नाही, तोपर्यंत केवळ काश्मीरच नव्हे, तर भारतात जिहादी आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे नागरिकांच्या रक्षणासाठी अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करण्यासाठी पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना नष्ट करणे आवश्यक !