भगवान श्रीकृष्णाच्या भूमीत आणि हिंदूबहुल भारतात भगवद्गीता शिकवण्याला विरोध होणे हिंदूंना लज्जास्पद !
‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) इयत्ता ६ वी आणि ७ वीच्या पाठ्यपुस्तकात श्रीमद्भगवद्गीतेचा संदर्भ अन् इयत्ता ११ वी, तसेच १२ वीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकात त्यातील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे’, अशी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लोकसभेत माहिती दिली.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. विरोधी पक्षाच्या मते ‘पाठ्यपुस्तकात श्रीमद्भगवद्गीता शिकवणे, म्हणजे शिक्षणव्यवस्थेचे भगवेकरणाचा प्रयत्न करणे होय.’ हिंदूंच्या सर्व गोष्टींना विरोध करणे, हा विरोधी पक्षांचा एककलमी कार्यक्रम आहे. जगातील सर्वांत ‘सहिष्णू धर्म’ म्हणून हिंदु धर्माचा गौरव विश्वातील सर्व विद्वानांनी एकमुखाने केला आहे. हिंदु धर्मातील कोणतेही वचन आपण घेतले, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे आपल्याला काहीही आढळत नाही. वास्तविक ‘हिंदु धर्म हा वैश्विक धर्म आहे’, हीच गोष्ट अनेक जण नाकारतात. त्यामुळेच समस्या उभी राहिली आहे.
१. हिंदु धर्म वैश्विक असल्याचे दर्शवणारे विविध श्लोक
‘हिंदु धर्म हा वैश्विक धर्म आहे’, हे स्पष्ट करणारी याच धर्मातील काही वचने वानगीदाखल आपण पाहू.
सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ।।
अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.
यात अखिल मानव जातीसाठी प्रार्थना करण्यात आली आहे. केवळ हिंदू समाजासाठी ही प्रार्थना नाही.
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्माऽमृतं गमय ।
– बृहदारण्यकोपनिषद्, अध्याय १, ब्राह्मण ३, वाक्य २८ॐ शान्ति शान्ति शान्ति: ।।
अर्थ : हे परमेश्वरा ! मला असत्याकडून सत्याकडे ने, मला अंधारातून प्रकाशाकडे ने, मला मृत्यूपासून अमृतत्त्वाकडे ने.
अशी प्रार्थना अखिल मानवजातीसाठीच करण्यात आली आहे.
सर्वांशी सुख लाभावे तशी आरोग्य धनसंपदा ।
कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये ।।
एक एका साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ ।।
– तुकाराम गाथा, अभंग ५८६, ओवी १
अर्थ : अहो जन हो, तुम्ही आणि आम्ही (सर्वजण) मिळून एकमेकांच्या साहाय्याने चांगली वाट धरूया.
अशी अनंत वचनेसुद्धा विशिष्ट मानवी समाजासाठी सांगितलेली नाहीत. हे सहजपणे आपल्या लक्षात येण्यास कोणतीही अडचण नाही.
२. बळजोरीच्या धर्मांतराविषयी शिकवण न देणारा एकमेव हिंदु धर्म
‘जगामध्ये एकच देव असून त्या देवाविना अन्य कोणताही देव श्रेष्ठ नाही. जो आमच्या देवाला मानत नाही, त्याला ठार मारा. आमचा धर्म स्वीकारा, नाहीतर मृत्यूला सामोरे जा’, अशा प्रकारची शिकवण हिंदु धर्म देत नाही. तशा प्रकारची एकही प्रार्थना किंवा वचन हिंदूच्या कोणत्याही ग्रंथात आढळत नाही.
३. वैचारिक स्वातंत्र्य आणि स्वतंत्रपणा हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !
श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर जो उपदेश केला तो उपदेश, म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता होय. या गीतेच्या शेवटच्या १८ व्या अध्यायातील ६३ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ६३
अर्थ : अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ‘मी सांगतो तसेच कर’, असे सांगितले नाही. ‘त्याला आवडेल तसे त्याने करावे’, असे वैचारिक स्वातंत्र्य आणि स्वतंत्रपणे निर्मिती करण्याचा अधिकार अर्जुनाला भगवंताने दिला आहे. हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.
४. जगातील अनेक विद्वानांनी गीतेला ‘जीवन ग्रंथ’ म्हणण्यामागील कारण
श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ केवळ हिंदूंसाठी नसून तो अखिल मानव समाजासाठी आहे. जगातील अनेक विद्वानांनी या ग्रंथाला ‘सर्वोच्च ग्रंथ’ म्हणून गौरवले आहे. ज्या वेळी माणूस संभ्रमात पडतो, काय करावे ? आणि काय करू नये ? हे त्याला कळत नाही. अशा विचित्र परिस्थितीत मार्गदर्शन करणारा जगातील एकमेव ग्रंथ म्हणजे गीता होय. या ग्रंथामुळे माणसाला मनःशांती प्राप्त होते. माणसाची संभ्रमावस्था दूर होते. माणसाची मानसिक दुर्बलता दूर करण्याचे सामथ्र्य गीतेत आहे. थोडक्यात भय, ताण, असाहाय्यता, मानसिक आघात, निराशा, चिंता, आत्मविश्वासाचा अभाव आणि संभ्रमावस्था या मानवाच्या मानसिक समस्या दूर करण्याचे सामथ्र्य असणारा सर्वांत श्रेष्ठ असा गीता ग्रंथ आहे. म्हणूनच जगातील अनेक विद्वानांनी गीतेला ‘जीवन ग्रंथ’ म्हटले आहे.
५. विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केंद्रशासनाचा प्रयत्न
आज अनेक तरुण निराशेच्या पाशात अडकून आत्महत्या करत आहेत. देशात तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. अशा मानसिक दुर्बलतेला बळी पडलेल्यांना आणि मानसिक दुर्बलतेचे भक्ष्य ठरू नये; म्हणून तरुणांना, विद्यार्थ्यांना मानसिक बळ देण्यासाठी आणि त्यांच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गीता ग्रंथाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, या हेतूनेच केंद्रशासन काही प्रयत्न करत असेल, तर त्याला अपशकुन करण्याचे कारण नाही.
६. गीतेतील विचारांमुळे प्रभावित झाल्यानेच त्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद
संपूर्ण वैदिक धर्माचे सार भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून व्यक्त झाले, तेच गीता ग्रंथात शब्दबद्ध करण्यात आले आहे. इस्लाम, ख्रिस्ती या धर्माच्या अनुयायांनी त्यांच्या त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्या धर्मग्रंथाचे जगातील विविध भाषांमध्ये अनुवाद केले आहेत. ‘गीता’ हा एकमेव असा ग्रंथ आहे की, या ग्रंथातील विचार आणि ज्ञान यांवर जगातील विद्वानांची श्रद्धा बसली. त्यांनी स्वेच्छेने या ग्रंथाचा आपापल्या भाषांमध्ये अनुवाद केला, म्हणजेच हिंदु धर्माच्या प्रचार आणि प्रसार यांसाठी या अनुवाद केला नसून तो ग्रंथ ज्यांना ज्यांना श्रेष्ठ ग्रंथ वाटला, त्यांनी त्या ग्रंथातील विचारांच्या प्रेमापोटी विविध भाषांमध्ये अनुवाद केला. हेच या गीता ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.
७. परदेशातील विद्वानांनी गीतेविषयी काढलेले गौरवोद्गार
७ अ. विद्वान थॉमस कार्लाईल, इंग्लंड : अमेरिकेमध्ये उदारमतवाद अस्तित्वात आला, त्यामागे अमेरिकेतील विद्वान इमर्सन कारणीभूत आहेत. या विद्वान गृहस्थाने त्यांच्या आयुष्यातील ४८ वर्षांचा काळ युनायटेड स्टेट्सच्या कंकार्ड शहरात व्यतीत केला. हा विद्वान गृहस्थ ज्या वेळी इंग्लंडला गेला, त्या वेळी त्यांची भेट थॉमस कार्लाईल नावाच्या एका विद्वानाशी झाली. त्या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. निरोप घेण्याचा जेव्हा क्षण आला, त्या वेळी थॉमस कार्लाईल यांनी इमर्सन यांना जीवनातील सत्य सिद्धांताने भरलेला ग्रंथ म्हणून ‘गीता’ भेट दिली. त्या वेळी थॉमस कार्लाईल यांनी तो वाचून त्यांच्या हाती कोणता सिद्धांत लागला ? हे सांगतांना म्हटले, ‘‘When virtue goes to the extreme it becomes vice. Real virtue is the golden mean between two extremities.’’ (जेव्हा सद्गुणाचे टोक गाठले जाते, तेव्हा तो दुर्गुण होतो. खरा सद्गुण म्हणजे सद्गुण आणि दुर्गुण यांचा काढलेला सुवर्णमध्य होय.)
७ आ. विद्वान इमर्सन, अमेरिका : इमर्सने गीता ग्रंथ वाचला. त्या वेळी झालेल्या बौद्धिक आणि मानसिक आनंदाने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्या अत्यानंदात ते तल्लीन झाले आणि त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर पडले, ‘‘Geeta means empire of thoughts.’’ (गीता ग्रंथ म्हणजे विचारांचे साम्राज्य आहे.)
७ इ. पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते थोरो : यांना विचारण्यात आले, ‘‘तुमचा आचार एवढा चांगला. तुमचे विचार एवढे चांगले. यामागचे रहस्य काय ?’’ त्यांनी क्षणाचाही वेळ न घालवता उत्तर दिले, ‘‘याचे रहस्य म्हणजे मी प्रतिदिन पहाटे गीता वाचतो.’’
७ ई. डॉ. टायनबी : हे गत शतकातील सर्वांत विद्वान गृहस्थ ! त्यांनी म्हटले, ‘‘जगातील सर्व ग्रंथांमध्ये सर्वांत श्रेष्ठ ग्रंथ म्हणून जर एखाद्या ग्रंथाची निवड करायची असेल, तर मी गीतेची करीन.’’
७ उ. डॉ. जोड नावाचा एक महान विद्वान तत्त्वज्ञानी होता. त्याने अनेक ग्रंथ वाचले. गीता ग्रंथ वाचल्यावर त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळला. त्यांचा अंतःकाळ जवळ आला, त्या वेळी त्यांनी गीता ग्रंथाची महती गायली.
८. इंग्रजांचे हिंदुस्थानातील पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने गीता ग्रंथाचा अनुवाद करणे
आपल्या देशावर इंग्रजांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले. वॉरन हेस्टिंग्ज हे हिंदुस्थानातील पहिले गव्हर्नर जनरल. त्यांच्या वाचनात गीता ग्रंथ आला. या ग्रंथातील तत्त्वज्ञानाने त्यांना मोहित केले. त्यांचा चाल्र्स विल्किन्स या नावाचा एक सहकारी होता. वॉरन हेस्टिंग्जने चाल्र्स विल्किन्स याला वाराणसीला गीतेचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. चाल्र्स विल्किन्स यांनी वाराणसीत ५ वर्षे राहून गीतेचा सखोल अभ्यास केला. वर्ष १८७५ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने ‘मरणे’ आणि ‘मारणे’ या विषयावर विवेचन करणार्या गीता ग्रंथाचा अनुवाद केला.
९. विचारांच्या द्वंद्वांमधून बाहेर पडण्याचे मार्गदर्शन करणारा एकमेव ग्रंथ ‘गीता’
गीता अंत:करणातील तुच्छ दुबळेपणा टाकून देण्यासाठी साहाय्य करते. एखादे कार्य माझ्या हातून घडेल किंवा नाही ? अशी शंका कुणाच्याही मनात येऊ शकते. अशा शंकेला किंवा अशा विचाराला माणसाने आपल्या मनात स्थान देऊ नये. माणसाने आत्मविश्वासाने प्रयत्न केला की, त्याला यश प्राप्त होते. माणूस सुख-दुःख, मान-अपमान, यश-अपयश अशा विविध प्रकारच्या द्वंद्वांमध्ये अडकलेला असतो. यामधून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल, तर गीता ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करतो.
१०. ध्येय प्राप्तीपर्यंत कामकरण्याचा संदेश देणारी गीता !
प्रत्येक माणसात प्रचंड शक्ती आहे. ही शक्ती सुप्तावस्थेत आहे. तिचा माणसाने चांगल्या कामासाठी उपयोग केला, तर तो श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. म्हणूनच ‘ध्येय प्राप्त होईपर्यंत काम करा’, असा संदेश गीता ग्रंथ देतो. या सर्व विवेचनावरून श्रीमद्भगवद्गीता हा अलौकिक ग्रंथ आहे, याची साक्ष पटते.
११. ज्ञानाचे महत्त्व सांगणारा ग्रंथ ‘गीता’ !
गीता ज्ञानाचे महत्त्व सांगणारा ग्रंथ आहे. जगात ज्ञानाला श्रेष्ठत्व आहे. याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. म्हणून ज्ञानाचे महत्त्व सांगणार्या गीतेला विरोध करण्याचे कारण नाही.
‘ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ३७) म्हणजे ‘तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो’, म्हणजे स्वतःच्या बुद्धीने आरंभलेल्या निष्काम कर्माने ज्ञानप्राप्ती करून घ्यायची. हा ज्ञान संपादनाचा मुख्य मार्ग आहे. ज्याला स्वतः आपल्या बुद्धीने ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही, त्यांच्यासाठी श्रद्धेचा दुसरा मार्ग सांगण्यात आला आहे. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।’(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ३८) म्हणजे ‘या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही.’ असे सांगून गीताग्रंथ माणसाची ज्ञानलालसा उद्दीपित करतो.
१२. गीतेत प्रयत्नवादाविषयी सांगितलेले सार
गीतेने दैववादाला दूर सारून प्रयत्नवादाचा पुरस्कार करतांना म्हटले आहे,
‘उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ५
अर्थ : स्वतःच स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये; कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.’प्रत्येक माणसामध्ये स्वतःचा उद्धार करून घेण्याची क्षमता आहे.
१३. माणसाने सुसंस्कृत आणि सुविद्य होण्यासाठी गीतेमध्ये सांगितलेली क्लृप्ती
‘माणसाने स्वतःचा मित्र होण्यासाठी काय करावे ?’, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला गीताग्रंथातच सापडते.
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित: ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ६
अर्थ : ज्या जीवात्म्याने मन आणि इंद्रियासह शरीर जिंकले, त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे अन् ज्याने मन आणि इंद्रियांसह शरीर जिंकले नाही, त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रूत्व करतो.
मनावर आणि इंद्रियांवर ज्याने विजय संपादन केला तोच स्वतः स्वतःचा मित्र आणि ज्याला हे जमले नाही तोच स्वतःचा शत्रू होय ! मन आणि इंद्रिये यांवर नियंत्रण ठेवल्यामुळे आपण कोणत्याही प्रलोभनांना बळी पडत नाही. कोणत्याही प्रकारची लालसा, वासना आपल्या मनात निर्माण होण्याची शक्यता नसते. त्यामुळे आपल्या हातून कोणत्याही प्रकारचे कुकर्म घडत नाही. याचाच अर्थ माणूस सुसंस्कृत आणि सुविद्य होतो. त्याच्यात पाशवी वृत्ती निर्माण होत नाही. असा सुविद्य आणि सुसंस्कृत माणूस सत्य, न्याय अन् नैतिकता यांच्या मर्यादेत राहून जीवन जगतो.
१४. विरोधकांचा विरोध हा केवळ विरोधासाठी केलेला विरोध !
माणसाच्या मनावर अशा प्रकारचे संस्कार करणारा ‘गीता’ हा खरा विश्वधर्माचे संस्कार करणारा ग्रंथ आहे. अशा ग्रंथाची शिकवण शालेय विद्याथ्र्यांवर करण्याचा निर्णय जर केंद्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी केंद्रशासनाला धन्यवाद देऊन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणे योग्य आहे. त्याऐवजी विरोधक अशा उत्तम निर्णयाला विरोध करतात, हेच दुःखदायक आहे. विरोधकांचा हा विरोध म्हणजे विरोधासाठी केलेला विरोध आहे. त्यासह गीतेचा अभ्यास नाही, अशा अज्ञानी लोकांनी संख्याबळावर केलेला विरोध ग्राह्य धरता येणार नाही.
१५. केंद्रशासनाच्या स्तुत्य निर्णयाला पाठबळ देणे हेच खरे राष्ट्रीय कर्तव्य !
लोकशाहीत संख्याबळाला महत्त्व असले, तरी त्याला मर्यादा आहे. प्रत्येक गोष्ट संख्याबळाचा विचार करून ग्राह्य किंवा अग्राह्य ठरवता येणार नाही; कारण संख्याबळापेक्षा गुणबळ श्रेष्ठ आहे. संख्याबळाकडे लक्ष देऊन गुणबळाकडे दुर्लक्ष करणे घातक ठरते. ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. तात्पर्य विरोधकांच्या विरोधाला न जुमानता सर्व जनतेने केंद्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून त्यांना आपले पाठबळ दिले पाहिजे; कारण तेच आपले खरे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२६.१२.२०२२)