म्हादई जलवाटप तंटा

  • मुख्यमंत्री डॉ. सावंत राज्यातील ४० आमदारांशी चर्चा करणार

  • भाजपच्या गाभा समितीचीही बैठक होणार

पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – म्हादई नदीचे पाणी कळसा आणि भंडुरा येथे उभारण्यात येणार्‍या धरणांच्या माध्यमातून मलप्रभा नदीत वळवण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारला संमती दिल्याने गोव्यात तीव्र असंतोष उमटला आहे. या पाश्र्वभूमीवर
गोव्यात २ जानेवारी या दिवशी निरनिराळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारी ४ वाजता सर्वपक्षीय ४० ही आमदारांची बैठक बोलावली आहे, तसेच यानंतर सायंकाळी भाजपची गाभा समिती आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. तत्पूर्वी दुपारी २ वाजता विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सर्व विरोधी आमदारांची बैठक बोलावली आहे.

म्हादईच्या प्रश्नावर सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी देहली येथे नेण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. कळसा-भंडुरा प्रकल्प झाल्यास गोव्याची पर्यावरणी हानी मोठ्या प्रमाणात होणार आहे. गोमंतकियांना पिण्याचे आणि शेती-बागायती यांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य होऊ शकते. यामुळे केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वच थरांतून संताप व्यक्त केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, ‘‘२ जानेवारीला भाजपच्या गाभा समितीची बैठक झाल्यानंतर म्हादई प्रश्नी भाष्य करणार.’’

कर्नाटकला पाणी वळवण्यास दिलेली संमती मागे घ्या ! – चिंचीणी पंचायत मागणीचा ठराव घेणार

मडगाव, १ जानेवारी (वार्ता.) – केंद्राने कर्नाटक सरकारला म्हादईच्या उगमस्थानी कळसा-भंडुरा प्रकल्प उभारण्यासाठी दिलेला ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ (डी.पी.आर्.) त्वरित मागे घ्यावा, या मागणीला अनुसरून ठराव घेण्याचा निर्णय गोव्यातील चिंचीणी-देवसा पंचायतीने घेतला आहे. ‘पंचायतीच्या ३ जानेवारी या दिवशी होणार्‍या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे’, अशी माहिती पंचायतीचे पंचसदस्य फ्रेंक वेगस यांनी दिली आहे. पंचसदस्य फ्रेंक वेगस म्हणाले, ‘‘गोव्यातील सर्व पंचायतींनी म्हादई वाचवण्यासाठी अशा स्वरूपाचे ठराव घेणे आवश्यक आहे.’’

link : “सनातन प्रभात”

कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी केंद्रीय जल आयोगाने लादल्या अटी !

https://sanatanprabhat.org/marathi/641439.html