सातारा नगरपालिकेने शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या !

सातारा, १ जानेवारी (वार्ता.) – शहरातील शिवतीर्थ (पोवई नाका) येथील सुशोभीकरणाचे काम सातारा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी पालिकेच्या वतीने तज्ञ वास्तूविशारदांकडून रेखा नकाशे सिद्ध करून घेण्यात आले आहेत. शिवतीर्थाचे काम स्वराज्याची राजधानी सातारा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला साजेसे असे भव्य स्वरूपाचे व्हावे, अशी सातारा नगरपालिकेची इच्छा आहे, तसेच या कामांमध्ये शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असावा, यासाठी कामाच्या आराखड्यात समाविष्ट गोष्टी आणि आवश्यक कामे करण्याविषयी नागरिकांकडून सुधारणा, सूचना अन् हरकती मागवण्याचा सातारा नगरपालिकेचा मानस आहे, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ते म्हणाले की, शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी तज्ञ वास्तूविशारदांनी सिद्ध केलेले रेखा नकाशे पालिकेच्या मुख्य इमारतीमधील सूचना फलकामध्ये लावण्यात आले आहेत. पुढील ८ दिवसांच्या आत सातारा शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी नगरपालिकेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेला रेखा नकाशा पहावा आणि यामध्ये काही सुधारणा, सूचना किंवा हरकती असतील, तर त्या लेखी स्वरूपामध्ये सातारा नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात सादर कराव्यात.