विविध मागण्यांसाठी २ जानेवारीपासून ‘मार्ड’च्या वतीने संपाची चेतावणी

५ सहस्रांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संप पुकारणार !

‘मार्ड’च्या वतीने संपाची चेतावणी

मुंबई – राज्यभरातील ५ सहस्रांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर’च्या) वतीने संपाची चेतावणी देण्यात आली आहे. संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे. संपाच्या वेळी अतीदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. यामुळे मुंबईत के.ई.एम्., नायर, सायन, कूपर आणि जे.जे. या रुग्णालयांना फटका बसू शकतो. प्रशासनाने त्यांना पर्यायी व्यवस्थेच्या सूचना दिल्या आहेत. चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने २ जानेवारीपासून संघटना संपाच्या मतावर ठाम आहेत.

शासकीय आणि महाविद्यालयातील वसतीगृहांची दुरुस्ती करण्यात यावी, सहयोगी आणि साहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरावीत, मागील कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांना न दिलेला महागाई भत्ता देण्यात यावा, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्यात यावे, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

संपादकीय भूमिका

प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या समस्या वेळीच का सोडवल्या नाहीत ? संपामुळे जनतेच्या होणार्‍या हानीचे दायित्व कुणाचे ?