अत्यंत कठीण परिस्थितीतही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असणार्या श्रद्धेच्या बळावर तळमळीने साधना आणि सेवा करणार्या नवीन पनवेल (रायगड) येथील सौ. कविता पवार !
‘सौ. कविता पवार या मागील अडीच वर्षांपासून धर्मशिक्षणवर्गाला येत आहेत. त्यांना साधना करण्यासाठी घरातून विरोध आहे, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असणार्या श्रद्धेच्या बळावर त्या तळमळीने साधना करत आहेत.
१. यजमानांनी धर्मशिक्षणवर्गाला जाण्यासाठी विरोध करणे
‘मी गेल्या अडीच वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या नवीन पनवेल येथे चालू असलेल्या धर्मशिक्षणवर्गाला जाते. माझ्या यजमानांना मी धर्मशिक्षणवर्गाला गेल्याचे कळल्यावर ते मला रागावून म्हणाले, ‘‘वर्गाला जाण्याची आवश्यकता नाही. तू वर्गाला गेलीस, तर मला आवडणार नाही.’’
२. घरातील त्रासांना कंटाळून टोकाचे नकारात्कम विचार मनात येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र हातात घेऊन त्यांना आत्मनिवेदन केल्यावर ‘ते प्रारब्ध सहन करण्याची शक्ती देतील’, असा सकारात्मक विचार येऊन मन शांत होणे
त्या वेळी यजमान नोकरी करत नसल्याने घरीच असायचे. ‘घरातील आर्थिक अडचणी, यजमानांचा मोठेपणा मिरवण्याचा स्वभाव आणि मुलाच्या शिक्षणासाठी होणारा व्यय’, या सर्व अडचणींमुळे मी पुष्कळ त्रस्त झाले होते. यजमान काहीतरी कारण काढून घरात वाद वाढवायचे. या सर्व गोष्टींना कंटाळून माझ्या मनात ‘माझ्या जीवनात काही चांगले होणार नाही’, असे नकारात्मक विचार येऊ लागले होते. तेव्हा माझ्या जवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र होते. मी त्यांचे छायाचित्र हातात घेऊन त्यांना माझ्या मनाची स्थिती सांगितल्यावर माझ्या मनाला स्थिरता आली. त्यानंतर ‘परात्पर गुरु डॉक्टर मला प्रारब्ध सहन करण्याची शक्ती देतील’, असा सकारात्मक विचार येऊन माझे मन शांत झाले.
३. गुरुकृपेने यजमानांना नोकरी लागणे, ‘सेवेला जाण्यासाठी किंवा अर्पण देण्यासाठी साधिका पैसे व्यय करणार’, या भीतीने यजमानांनी साधिकेला घरखर्चासाठी पैसे न देणे
गुरूंच्या कृपेने यजमानांना एका ठिकाणी काम मिळाले. त्या वेळी ‘गुरुदेवच आपली काळजी घेणार आहेत’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली. यजमान कामावरून घरी आल्यानंतर ‘मी कुठे गेले ?’, याची चौकशी करत असत. मी सत्संगाला किंवा सेवेला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यास ते आरडाओरड करत. ते लहान-सहान गोष्टींवरून प्रतिदिन वाद उकरून काढायचे. काही वेळा ते मला घराबाहेर ठेवत असत. ‘सेवेला जाण्यासाठी किंवा अर्पण करण्यासाठी मी पैसे वापरीन’, असा विचार करून ते मला घरखर्चालासुद्धा पैसे देत नसत.
४. ‘परिस्थितीमुळे गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण देता येत नाही’, याचे वाईट वाटणे, ‘पैसे अर्पण करण्यापेक्षा मनाने तुलसीदल अर्पण कर’, असे गुरुदेवांनी सुचवल्यावर त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकदा प्रसारसेवेवरून घरी परत आल्यावर ‘परिस्थितीमुळे गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण करता येत नाही’, या विचाराने मला भरून आले. तेव्हा सायंकाळच्या जेवणासाठी तांदूळ आणण्यासाठी माझ्याकडे १० रुपये होते. माझ्या मनात ‘१० रुपयांचे तांदूळ आणण्यापेक्षा ते रुपये अर्पण करावेत’, असा विचार आला. तेव्हा मला ‘नेमके काय करावे ?’, हे न सुचल्याने मला रडू आले. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी मला ‘पैसे अर्पण करण्यापेक्षा मनाने तुलसीदल अर्पण कर’, असे सुचवले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५. परिस्थितीला आनंदाने सामोरे जाण्याचा निर्धार करणे
त्या क्षणापासून माझ्या मनाच्या स्थितीत पुष्कळ पालट होत आहेत. ‘घरातील जी परिस्थिती आहे, ती स्वीकारायची. घरातील प्रत्येक सेवा नामजप करत करायची. भूतकाळ आणि भविष्यकाळ या संदर्भात कुठलाही विचार करायचा नाही’, असे मी ठरवले.
६. यजमानांचा विरोध असला, तरीही ७ ठिकाणी कामे करून संध्याकाळी सेवेला जाऊ शकणे
घरी यजमानांचा विरोध वाढतच होता; परंतु ‘आता साक्षात् श्रीमन्नारायण माझ्यासह आहेत’, असा माझा भाव असल्याने मला यजमानांची पूर्वीसारखी भीती वाटत नव्हती. यजमान नोकरी करत असूनही घरखर्चाला पैसे देत नाहीत; परंतु मी त्यांच्याशी वाद न घालता अनेक वर्षांपासून सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सात ठिकाणी घरकाम करते आणि त्यानंतर सेवा करते.(सध्या यजमानांचा विरोध काही प्रमाणात न्यून झाला आहे. – संकलक)
७. वसाहतीतील महिला बचत गटाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, या नावाचा ‘स्टँम्प’ सिद्ध करण्याविषयी सुचवल्यावर बचत गटातील महिलांनी त्याला होकार देणे
आमच्या वसाहतीतील काही महिलांनी एकत्र येऊन महिला बचत गट स्थापन केला आहे. मी वसाहतीतील महिलांना नामजपाचे महत्त्व सांगितल्यावर त्या ‘आता नको. नंतर बघू’, असे म्हणून मी सांगत असलेल्या विषयाकडे दुर्लक्ष करत. त्यांनी माझ्यावर बचत गटाचे दायित्व दिले. तेव्हा बचत गटासाठी ‘स्टॅम्प’ (रबरी शिक्का) सिद्ध करायचा होता; परंतु ‘त्यावर नाव कुणाचे घालायचे ?’, अशी एकमेकांत चर्चा होऊ लागली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, या नावाचा ‘स्टॅम्प’ सिद्ध करूया. या निमित्ताने या ‘सर्व महिलांचा ‘स्टॅम्प’ मारतांना नामजप होईल.’ मी याविषयी बचत गटातील महिलांना सुचवल्यावर त्यांनीसुद्धा याला होकार दिला. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली, तसेच ‘गुरुदेव अध्यात्मप्रसार कसा करून घेतात ?’, हे मला शिकायला मिळाले.
परात्पर गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच मी साधना आणि सेवा करू शकत आहे. ‘परात्पर गुरुदेवांनी मला सदैव त्यांच्या चरणी ठेवावे’, अशी त्यांच्या कोमल चरणी आर्तभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. कविता पवार, नवीन पनवेल, जिल्हा रायगड. (३.५.२०२०)
सनातनच्या साधिका श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी दिलेला आधार !१. यजमानांचे वेतन अपुरे असल्याने श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्या घरी कामाला जाणे, तेथे काम केल्यावर पुष्कळ थकवा येणे आणि प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजींच्या खोलीत बसून नामजप केल्यानंतर थकवा न्यून होणे : घरातील आणि मुलांच्या शिक्षणासाठी होणारा व्यय लक्षात घेता यजमानांना मिळणारे वेतन अपुरे पडत असे. त्या वेळी माझ्या मनात ‘काहीतरी काम करावे’, असा विचार आला. दुसर्याच दिवशी मला देवद, पनवेल येथील सनातन संकुलात श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) (प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजींच्या कन्या) यांच्या घरी मला ‘गृहकृत्य साहाय्यक’ म्हणून काम मिळाले. त्यांच्या घरी काम करू लागल्यानंतर आरंभी मला पुष्कळ थकवा येत असे. त्यामुळे माझ्यात काम करण्यासाठी त्राण नसायचे. मला ‘असे का होत आहे ?’, हे कळायचे नाही. तेव्हा गाडगीळकाकूंनी ‘‘काळजी करू नकोस. तुला बरे वाटेल’’, असे सांगून मला धीर दिला. त्यांनी मला प.पू. फडकेआजींच्या खोलीत बसून नामजप करायला सांगितला. नामजप केल्यानंतर मला चांगले वाटायचे. त्यानंतर मी नियमित प्रथम प.पू. फडकेआजींच्या खोलीत बसून काही वेळ नामजप करायचे आणि त्यानंतरच कामाला आरंभ करायचे. २. श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी साहाय्य केल्यामुळे सेवेची संधी मिळणे : मी गाडगीळकाकूंना ‘‘यजमान सेवेला जाऊ देत नाहीत’, अशी अडचण सांगितली. त्यावर काकू म्हणाल्या, ‘‘तुला सेवा करण्याची पुष्कळ तळमळ आहे. तू काळजी करू नकोस. जेव्हा तुला ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेला जायचे असेल, तेव्हा तू मला सांगत जा. त्या दिवशी मी घरातील तू करत असलेली सर्व कामे करीन. त्यामुळे तुला सत्सेवा करता येईल.’’ त्यांच्यामुळे मला सेवा करता आली. अशा प्रकारे माझी दिवसभर घरकामे, सेवा आणि साधना होऊ लागली. – सौ. कविता पवार, नवीन पनवेल (३.५.२०२०) |