नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – मुंबई येथील अंधेरीमधील साकीनाका परिसरात ‘प्लेसमेंट’ कार्यालय उघडून परदेशात नोकरीसाठी पाठवण्याचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांना फसवणारी टोळी असेल, तर याची चौकशी केली जाईल, तसेच फसवणुकीद्वारे काही बेरोजगार तरुणांना परदेशात पाठवले असेल, तर त्यांना देशात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिली. सदस्य विलास पोतनीस यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.
फडणवीस म्हणाले की, काही संस्था बेरोजगार तरुणांना परदेशात नोकरी देण्यासाठी खासगी व्यवसाय चालू करतात. त्यामुळे ते अधिक प्रमाणात शुल्क आकारतात; मात्र त्या खासगी संस्था आणि त्यांचा व्यवसाय हा हेतू असल्याने ते शुल्क अधिक आकारतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. सरकारला त्याविषयी कारवाई करता येत नाही. नोकरीच्या निमित्ताने फसवणूक करून परदेशात पाठवलेल्या पिंपरी चिंचवडच्या तरुणाला देशात परत आणण्यात आले आहे.