महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषद स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्यासाठी राज्याची आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ डिसेंबर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या शेवटच्या आठवड्याच्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.

याविषयी माहिती देतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. यासाठी या  परिषदेकडून राज्याचे महत्त्वाचे कार्यक्रम निश्चित केले जातील. टाटा सन कंपनीचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् हे या परिषदेचे अध्यक्षपद भूषवतील. अभियांत्रिकी, कृषी, वस्त्रोद्योग, शिक्षण, अधिकोष आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर या परिषदेत असतील. राज्यातील सर्व भागांचा समतोल विकास साधण्यासाठी ही समिती काम करेल.’’