‘मार्च २०२१ मध्ये मी माझ्या गावी गेलो होतो. माझी पत्नी आणि दोन्ही मुले डोंबिवली येथे रहात होती. याच कालावधीत कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत चालला होता. माझी पत्नी आणि दोन्ही मुले यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. आरंभी ‘ते औषधे आणि पथ्य पाळून बरे होतील’, असे मला वाटले होते; पण अकस्मात् ३१.३.२०२१ या दिवशी पत्नीतील प्राणवायूची पातळी न्यून झाली आणि तिला रुग्णालयात भरती करण्यात आले.
१. पत्नीच्या आजारपणात संत आणि गुरुदेव यांचे लाभलेले साहाय्य !
१ अ. पत्नीसाठी संतांनी नामजपादी उपाय करणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पत्नी या आजारातून बाहेर पडेल’, असे वाटून दुःख अन् भय न वाटणे : मी पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याविषयी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना सांगितले. त्यांनी मला अर्ध्या घंट्यात नामजपादी उपाय सांगितले. त्याप्रमाणे मी उपाय चालू केले. नगरपालिकेच्या रुग्णालयात तिच्यावर योग्य उपचार होत नव्हते; म्हणून आम्ही तिला खासगी रुग्णालयात भरती केले. सद्गुरु अनुताई प्रतिदिन पत्नीच्या आजारपणाविषयी विचारत होत्या. संत तिच्यासाठी नामजप करत होते. ‘आरंभी २ दिवस तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे’, असे मला वाटले; परंतु त्यानंतर तिच्यात प्रतिदिन आजाराची नवीन लक्षणे दिसू लागली. तिला आवश्यक असलेल्या प्राणवायूच्या मात्रेत प्रतिदिन वाढ होत होती. ‘अशा परिस्थितीत पत्नीचा मृत्यू होईल’, असे मला वाटले नव्हते. ‘विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या कृपेमुळे साधक मृत्यूच्या दाढेतून बाहेर येऊ शकतात’, या श्रद्धेने मी प्रतिदिन रुग्णालयात जात होतो. पत्नीची स्थिती फारच खालावत गेली. अशा कठीण परिस्थितीत गुरुदेवांनी मला दुःख आणि भय यांपासून दूर ठेवले.
१ आ. गुरुदेवांनी साधकाची सर्वार्थांनी घेतलेली काळजी : मी पत्नीसाठी सतत १५ दिवस रुग्णालयात ये-जा करत होतो. या कालावधीत अनेक जण त्या रुग्णालयात कोरोना चाचणी करायला यायचे. त्यामुळे रुग्णालयात पुष्कळ दाटी असायची. मला दमा आणि सर्दी यांचा त्रास होतो. अशा परिस्थितीत गुरुदेवांनी माझी सर्वार्थांनी काळजी घेतली.
२. पत्नीचे निधन झाल्यावर अनुभवलेली गुरुकृपा !
२ अ. ज्या दिवशी माझ्या पत्नीचे निधन झाले, त्या दिवशी मी रुग्णालयात असतांनाच सद्गुरु अनुताई आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला भ्रमणभाष करून धीर दिला. त्यानंतर पत्नीचे अंत्यविधी करून घरी येईपर्यंत माझ्या मनात दुःखाचा विचारही आला नाही.
२ आ. पत्नीच्या निधनानंतर तिच्या आई-वडिलांचे निधन होणे, अशा कठीण प्रसंगी सद्गुरु अनुताईंनी धीर देऊन शिवाचा नामजप करायला सांगितल्यावर मन शांत होणे : ‘पत्नीच्या निधनानंतर सर्व व्यावहारिक कामे पूर्ण करून लवकरात लवकर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात कसे जाता येईल ?’, असा माझा विचार होता. ‘आश्रमात गेल्यावर दुःख विसरता येईल’, असेही मला वाटत होते. पत्नी गेल्यानंतर तिच्या चौदाव्या दिवशी तिच्या आईचे आणि त्यांच्या तेराव्या दिवशी पत्नीच्या वडिलांचे निधन झाले. त्या वेळी ‘आम्हाला आधार द्यायला कुणीतरी हवे होते’, असे वाटून मला फार दुःख झाले. तेव्हा सद्गुरु अनुताईंनी मला धीर दिला. त्यांनी मला शिवाचा नामजप करायला सांगितले. त्यानंतर मी शांत झालो.
२ इ. स्वतःचा स्वभाव हळवा आणि भावनिक असूनही पत्नीच्या निधनाच्या दुःखद प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने स्थिर राहू शकणे : पत्नीचे निधन झाल्यानंतर काही दिवस ‘तिचा मृत्यू झाला आहे’, असे मला वाटत नव्हते. ‘ती रामनाथी आश्रमात शिबिराला गेली आहे किंवा देवद आश्रमात सेवेनिमित्त गेली आहे’, असेच मला वाटायचे. खरेतर माझा स्वभाव फार हळवा आणि भावनिक आहे. अशा कठीण परिस्थितीत मी साधनेत नसतो, तर कदाचित् व्यसनाधीन झालो असतो. मी दुःखाने खचून गेलो असतो; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला स्थिर रहाता आले.
२ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे दोन्ही मुलांनी आश्रमात सेवा करणे : माझ्या दोन्ही मुलांनी एकदाही आई गेल्याचे दुःख व्यक्त केले नाही किंवा मला त्याची पुसटशी जाणीवही होऊ दिली नाही. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे त्यांच्यामध्ये एवढे गांभीर्य निर्माण झाले. आता दोन्ही मुले आश्रमात सेवा करत आहेत. मोठा मुलगा अनुराग याने स्वतःहून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रिया सत्संगाला (व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन करणारा सत्संग) जोडून घेतले आहे.
गुरुदेवांनी कठीण परिस्थितीत मला आणि मुलांना स्थिर ठेवले. त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे दयाळू गुरुमाऊली, माझे संपूर्ण जीवन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी उपयोगी येऊ दे’, अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे.’
– श्री. प्रकाश राऊत, फोंडा, गोवा. (१४.३.२०२२)
‘गुरुदेव साधकांना फुलाप्रमाणे जपत आहेत’, याची एका कठीण प्रसंगात साधकाला आलेली प्रचीती !
‘माझ्या पत्नीच्या निधनानंतर (१८.१०.२०२१ पासून) मी आणि माझी मुले (श्री. अनुराग (वय २५ वर्षे) आणि कु. पार्थ वय (वय १७ वर्षे)) रामनाथी आश्रमात सेवेला जाऊ लागलो. माझ्या दोन्ही मुलांना आश्रमजीवन, आश्रमातील कार्यपद्धत आणि वातावरण हे पूर्णपणे नवीन होते. त्यामुळे ‘मुले आश्रमात रमतील कि नाही ?’, अशी मला भीती वाटत होती. केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मुले आश्रमात रमू लागली. मी स्वयंपाकघरात सेवा करत होतो. मला सेवेतून आनंद मिळत असे. मी गुरुदेवांची अपार कृपा अनुभवत होतो.
१. घरी एकटा असतांना डोळ्यांपुढे अंधारी येणे आणि बेशुद्ध पडणे
एक दिवस आमच्या घरी नवीन धुलाईयंत्र आणायचे होते; म्हणून मुलाने मला आश्रमातून थोडे लवकर घरी पोचवले. नवीन धुलाईयंत्र घरी आणून दिल्यावर कर्मचारी जुने धुलाईयंत्र घेऊन जात होते. मी सुखासनावर बसलो होतो. तेव्हा मला अकस्मात् काही कळेनासे झाले. माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. थोड्या वेळाने मी दार बंद करायला उठत होतो; पण मला उठता येत नव्हते. माझा तोल जाऊन मी पडत होतो. मी दारापर्यंत गेलो आणि तिथेच पडून राहिलो. थोड्या वेळाने मला शुद्ध आली आणि मी कसाबसा दाराला धरून उठलो अन् पंख्याची गती वाढवली. मी कसाबसा पंख्याखाली सुखासनावर बसलो.
२. शुद्धीवर आल्यावर भ्रमणभाष करून साधकांना साहाय्यासाठी बोलावणे आणि त्यांनी रुग्णालयात भरती करणे
थोड्या वेळाने मी शुद्धीवर आलो. मी मुलाला आणि साधकांना भ्रमणभाष करत होतो. एका साधिकेने (सौ. ज्योस्ना जगताप यांनी) भ्रमणभाष घेतला. मी त्यांना माझ्या साहाय्यासाठी त्यांचे यजमान (श्री. जयवंत जगताप) किंवा मुलगा (श्री. शुभम जगताप) यांना पाठवण्यास सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने ते घरी आले. तेव्हा मी घामाने पूर्णपणे भिजलो होतो; परंतु मला मुळीच भीती वाटत नव्हती. मला घराजवळील सावईकर रुग्णालयात भरती केले. साधकांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली. त्यांनी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना संपर्क करून मला रात्री ‘गोवा मेडिकल कॉलेज’मध्ये भरती केले. सावईकर रुग्णालयात भरती केल्यापासून दुसर्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत मी गुंगीत होतो. दुसर्या दिवशी मी मुलाला विचारल्यावर ‘मला ‘गोवा मेडिकल कॉलेज’ येथे भरती केले आहे’, असे समजले.
३. हृदयविकाराचा झटका आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या माध्यमातून साहाय्य करून फुलाप्रमाणे सांभाळणे
या प्रसंगात गुरुकृपेने माझ्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. ‘गुरुदेव माझे प्रारब्ध नष्ट करत आहेत’, याची मला जाणीव झाली. हा सर्व घटनाक्रम पाहिला असता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझे सर्व प्रकारे रक्षण करत आहेत’, हे माझ्या लक्षात आले. ‘मी घरी एकटाच असतांना चक्कर येऊन घामाघूम होणे, ‘हृदयविकाराचा झटका आला आहे’, याची मला जाणीव न होणे, स्थिर रहाता येणे, शुद्धीवर आल्यावर साहाय्यासाठी भ्रमणभाष करणे, काही वेळातच साहाय्य मिळून रुग्णालयात भरती होणे, तसेच रुग्णालयात असतांना मुलाला साधकांकडून जेवणाचा डबा मिळणे’, या सर्व गोष्टींतून ‘गुरुदेव साधकांना फुलाप्रमाणे जपत आहेत’, असे मी अनुभवले.
‘हे गुरुमाऊली, अशा कठीण परिस्थितीत तुम्ही माझे सर्वार्थांनी रक्षण केले. त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. प्रकाश राऊत, फोंडा, गोवा. (१४.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |