गुडगाव येथील विद्यापिठातून एम्.बी.ए. झालेल्या, चंडीगड येथे शासकीय अधिकारी म्हणून पूर्वी कार्यरत असलेल्या, इंडिगो आस्थापनाची ‘एअर होस्टेस’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि व्हॉलीबॉल खेळात प्राविण्य मिळवलेल्या प्रिया नावाच्या झारखंडमधील एका युवतीने ठाकूरजी म्हणजे श्रीकृष्णाशी मोठ्या थाटामाटात विवाह केल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिच्या लांब आणि चकाकी असणार्या केसांमुळे ‘गार्नियर’ आस्थापनाने तिची केसांच्या विज्ञापनासाठी निवड केली होती; परंतु चित्रीकरणाच्या दिवशीच ती ‘ठाकूरजीं’कडे परत आली. ‘या सर्व मायापाशातून आणि लाखो रुपयांच्या नोकरीतून मला श्रीकृष्णानेच सोडवले’, असे त्या युवतीचे म्हणणे आहे. उत्तर भारतात असे अनेक धर्मउपासक आहेत, ज्यांनी त्यांच्या शिष्यांना श्रीकृष्णाचे वेड लावले आहे; त्यांपैकीच ही एक आहे. श्रीकृष्णाशी विवाह करण्यासाठी तिला कळत्या वयापासून आई-वडिलांची अनुमती मिळवण्यासाठी १४ वर्षे मोठा संघर्ष करावा लागला, मारण्याच्या धमक्याही सहन कराव्या लागल्या. ‘या सर्व श्रीकृष्णाच्या लीला आहेत’, अशी तिची दृढ श्रद्धा आहे. ती सतत श्रीकृष्णाशी संवाद साधत असते आणि त्याविषयीच्या असंख्य आश्चर्यकारक अनुभूती तिला सतत येत असतात अन् तिचे रक्षणही होते. ‘श्रीकृष्ण सतत माझ्यासमवेत आहे, माझ्या रोमारोमांत आहे’, असा तिचा भाव आहे. ‘एक क्षण जरी तुम्ही शरणागतीने त्याच्या चरणी समर्पित झालात, तर तो साक्षात् येतो. तुम्ही कुठल्याही भावाने त्याला आपले म्हणा, तो तुमच्या समवेत असेल’, असे ती सांगते. ‘देवाप्रती कसा भाव असायला हवा ?’, याचे उदाहरण या कलियुगातही या मुलीच्या रूपाने समोर आले आहे. त्यातून समाजाने शिकण्याचा प्रयत्न केला, तर घडोघडी निर्माण होणार्या आपत्कालीन स्थितीतून तरून जायला त्याला साहाय्य होईल !