गायरान भूमी घोटाळा आणि कृषी महोत्सवासाठी अधिकार्‍यांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हकालपट्टीसाठी विरोधक विधानसभेत आक्रमक !

डावीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – अधिकाराचा गैरवापर करून गायरान भूमी एका व्यक्तीला दिल्याप्रकरणी, तसेच सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी अयोग्य पद्धतीने पैसे वसूल केल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, यासाठी २६ डिसेंबर या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव उपस्थित करून सत्तार यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही चुकीच्या गोष्टीला पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन दिले; मात्र उत्तराने समाधान न झाल्यामुळे अध्यक्षांच्या पुढील दालनात बसून विरोधकांनी टाळ्या वाजवून भजनाच्या चालीत अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाईची मागणी केली.

या वेळी अजित पवार भूमिका मांडतांना म्हणाले, ‘‘मागील सरकारमधील महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी पदाचा दुरुपयोग करून वाशिम जिल्ह्यातील घोडबाबूल येथील ३९ एकर २९ गुंठे भूमी योगेश खंडाळे या व्यक्तीला दिली. हा १५० कोटी रुपयांचा भूमी घोटाळा आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गायरान भूमी कुणाला देता येत नाही. जिल्हा न्यायालयाने योगेश खंडाळे यांची याचिका फेटाळली आहे. कोणताही अधिकार नसतांना योगेश खंडाळे यांनी भूमीवर हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला. मंत्री महोदयांनी याविषयी माहिती असतांना भूमीचे वाटप केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. १७ जून २०२२ या दिवशी या भूमीचे वाटप करण्यात आले. याविषयी जिल्हाधिकार्‍यांनी ५ जुलै २०२२ या दिवशी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठवून या निर्णयामुळे सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान होईल असे नमूद करत सल्ला मागितला आहे.’’

कृषी प्रदर्शनासाठी राज्यभरातून २५ ते ३० कोटी रुपये जमा करण्यात आले ! – अजित पवार

अजित पवार

सिल्लोड येथे घेण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनासाठी राज्यभरातून २५ ते ३० कोटी रुपये जमा करण्यात आले. यामध्ये कार्यक्रमाचे कूपन सिद्ध करून ते खपवण्याचे दायित्व देण्यात आले. या कार्यक्रमात गायक अजय-अतुल, ह.भ.प. इंदोरकर महाराज, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गायक अवधुत गुप्ते यांचे कार्यक्रम घेण्यात आले. ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांवरही व्यय करण्यात आला. या कार्यक्रमांसाठी अधिकार्‍यांना वेठीस धरण्यात आले. यासाठी प्रत्येक कृषी दुकानदाराकडून ५ सहस्र रुपये वसूल करण्यात आले. हा भ्रष्टाचार आहे. ही दोन्ही प्रकरणे गंभीर असून या प्रकरणी कारवाई व्हायला हवी. महिला खासदाराविषयी अपशब्द वापरणे, जिल्हाधिकार्‍यांना ‘मद्य पिता का ?’, असे विचारणे, हा निर्लज्जपणाचे टोक आहे. या प्रकरणी संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी करावी.

आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली, तर काँग्रेसचे मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत कृषीमंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.