जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे न घेतल्याने विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग !

नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – सभापतींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली. जयंत पाटील यांना सहभागृहात सहभागी होण्याची अनुमती देण्याची मागणी या वेळी अजित पवार यांनी केली. याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सांगितले. हे उत्तर मान्य न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे तारांकित प्रश्नांवरील चर्चा विरोधकांच्या उपस्थितीविना झाली. जयंत पाटील यांनी सभागृहात ‘अध्यक्ष महोदय, तुम्ही असा निर्ल्लजपणा करू नका’, असे अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते.

संपादकीय भूमिका

स्वत:च्या नेत्यांच्या चुकीच्या वर्तनासाठी सभात्याग करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांनी वेळ देणे अपेक्षित आहे !