रामसेतूसारखी रचना पूर्वी अस्तित्वात असल्याचे संकेत !

केंद्र सरकारचे संसदेत विधान !

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (डावीकडे)

नवी देहली – ज्या ठिकाणी (भारत आणि श्रीलंका यांच्यातील समुद्रात) पौराणिक ‘रामसेतू’ असल्याचे मानले जाते त्या ठिकाणची उपग्रहांद्वारे छायाचित्रे काढण्यात आली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर खरे रूप तेथे आहे, हे सांगणे अवघड आहे. तथापि असे काही संकेत आहेत, जे सूचित करतात की, अशा प्रकारची रचना तेथे अस्तित्वात असू शकते, असे मत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत भाजपचे भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी रामसेतूवर विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना सांगितले.

जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही प्रमाणात आम्ही पुलाचे (रामसेतूचे) तुकडे आणि एक प्रकारचा चुनखडीचा ढिगारा ओळखण्यात यशस्वी झालो आहोत. तो पुलाचा भाग आहे कि त्याचे अवशेष हे आपण सांगू शकत नाही. शोधामध्ये आपल्याला काही मर्यादा आहेत; कारण त्याचा इतिहास १८ सहस्र वर्षे जुना आहे आणि जर आपण इतिहासात गेलो, तर हा पूल सुमारे ५६ किलोमीटर लांब होता.

काँग्रेसने रामसेतू श्रीरामाने बांधल्याचे सर्वोच्च न्यायालयात नाकारले होते !

वर्ष २००५ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘सेतूसमुद्रम्’ नावाच्या एका मोठ्या कालव्याच्या प्रकल्पाची घोषणा केली. यामध्ये रामसेतूच्या काही भागातून वाळू काढून तो उद्ध्वस्त केल्याचीही चर्चा होती. जेणेकरून नौका पाण्यात उतरू शकेल. या प्रकल्पामध्ये रामेश्‍वरम्ला देशातील सर्वांत मोठे बंदर बनवण्याचाही समावेश होता. यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये थेट सागरी मार्ग झाला असता. या व्यवसायात ५० सहस्र कोटी रुपयांचा नफा होईल, असा अंदाज होता. याला विरोध झाल्यावर सरकारने न्यायालयात ‘श्रीराम काल्पनिक असल्याने रामसेतू त्यांनी बांधलेला नाही’, असा दावा केला होता. त्याला देशभरातून विरोध झाल्यावर सरकारने हा दावा मागे घेतला होता आणि नंतर ही योजनाच रहित करण्यात आली होती. तसेच ‘या पुलाखालच्या ‘टेक्टोनिक प्लेट्स’च्या दुर्बलतेमुळे त्यात पालट केल्यास मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते’, असे शास्त्रज्ञांचे मत होते. येथे ३६ सहस्र प्रकारचे दुर्मिळ समुद्री जीव आणि वनस्पती असल्याचे पर्यावरणतज्ञांचे म्हणणे आहे. हा पूल उद्ध्स्त केल्याने दुर्मिळ प्राण्यांची ही परिसंस्था संपुष्टात येईल आणि पावसाळ्याच्या चक्रावर परिणाम होईल.

रामसेतूची माहिती

रामसेतू

भारताच्या रामेश्‍वरम् आणि श्रीलंकेच्या मन्नार बेट यांच्यामध्ये उथळ चुनखडीच्या खडकांची साखळी आहे. त्याला भारतात रामसेतू आणि जगभरात ‘अ‍ॅडम्स ब्रिज’  म्हटले जाते. याची लांबी ४८ कि.मी. आहे. हा पूल मन्नारचे आखात आणि पाल्क सामुद्रधुनी एकमेकांपासून वेगळे करतो. या भागात समुद्र खूप उथळ आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या नौका चालवण्यात अडचणी येतात. १५ व्या शतकापर्यंत यावरून रामेश्‍वरम् ते मन्नार बेटापर्यंत चालत जात येऊ शकत होते; मात्र वादळांमुळे येथील समुद्र खोल गेला आणि पूल समुद्रात बुडाला. वर्ष १९९३ मध्ये, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने या रामसेतूची उपग्रहाद्वारे काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली. ज्यात त्याचे वर्णन ‘मानवनिर्मित पूल’ असे केले गेले.

मोदी सरकार म्हणते, ‘रामसेतूचे कोणतेही पुरावे नाहीत !’ – काँग्रेसची टीका

काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी केंद्र सरकारच्या रामसेतूविषयीच्या या विधानावर टीका केली आहे. खेडा ट्वीट करतांना म्हणाले की, सर्व भक्तजन कान देऊन ऐका आणि डोळे उघडून पहा.

मोदी सरकार संसदेत म्हणत आहे की, रामसेतू असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.