भायखळा (मुंबई) येथील उर्दूभवन अल्पसंख्यांक असलेल्या ठिकाणी हलवावे ! – आमदार नीतेश राणे, भाजप

भाजपचे आमदार नीतेश राणे

नागपूर, २३ डिसेंबर (वार्ता.) – अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या सुटल्या पाहिजेत, याविषयी कुणाचेही दुमत नाही; मात्र अल्पसंख्यांक समाजाचा विकास करत असतांना बहुसंख्य समाजावर अन्याय होणार नाही, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भायखळा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी (आय.टी.आय.) आरक्षित असलेल्या भूखंडाचे आरक्षण रहित करून त्या ठिकाणी उर्दूभवन बांधण्याचे काम चालू आहे. ज्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाज आहे, त्या ठिकाणी हे उर्दूभवन हलवावे, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एका लक्षवेधीच्या वेळी केली.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी असलेले आरक्षण रहित करून असंख्य युवकांचा रोजगार बुडवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी मुसलमान समाज नाही, त्या ठिकाणी उर्दूभवन बांधून काय उपयोग ? ‘मुंबईमध्ये १८ उर्दू शाळा आहेत. त्या ठिकाणी उर्दूभवन न्यावे’, अशी मागणी या वेळी आमदार नीतेश राणे यांनी केली. यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन नीतेश राणे यांना दिले.