काँग्रेसच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास भरकटवला !

विधानसभेत आमदार रवी राणा यांचा गंभीर आरोप !

गुप्तचर यंत्रणेद्वारे चौकशी करण्याची राज्यशासनाची घोषणा !

डावीकडून उद्धव ठाकरे आणि आमदार रवी राणा

नागपूर, २३ डिसेंबर (वार्ता.) – नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट प्रसारित केल्यामुळे अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठ उमेश कोल्हे यांची हत्या झाली असतांना ही हत्या लुटमारीमुळे झाल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसच्या सांगण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे अन्वेषण भरकटवले, असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी २३ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केला. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्तांद्वारे याविषयी चौकशी करण्याची घोषणा केली.

येत्या १५ दिवसांत गुप्तचर यंत्रणेकडून अहवाल मागण्यात येईल. राणा यांनी केलेल्या प्रत्येक आरोपानुसार अहवाल मागवला जाईल. कुणाच्या सांगण्यावरून हे अन्वेषण भरकटवण्यात आले ? याचेही अन्वेषण केले जाईल, असे आश्वासन या वेळी शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिले. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी आमदार राम सातपुते यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या वेळी आमदार रवी राणा यांनी ही मागणी केली. उमेश कोल्हे यांची हत्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. उमेश कोल्हे हे हिंदुत्वाच्या विचारांचे होते. हत्या करण्यापूर्वी त्यांना धमक्या आल्या होत्या. त्याविषयी तक्रार करूनही पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. काँग्रेसच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही हत्या दरोडेखोरांनी केल्याचे दर्शवले. या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे करण्याची मागणी मी आणि खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. त्या वेळी उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे झाल्याचे लक्षात आहे. उद्धव ठाकरे यांनी हे हत्येचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. याविषयी विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी रवी राणा यांनी सभागृहात केली होती.