बलात्काराच्या आरोपाप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांची एस्.आय.टी.द्वारे चौकशी करा !

  • विधान परिषदेच्या सभापती नीलम गोर्‍हे यांचे आदेश

  • सत्ताधार्‍यांच्या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित !

विधान परिषदेच्या सभापती नीलम गोर्‍हे

नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण यंत्रणेद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी करण्यात यावी, असा आदेश सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी राज्य सरकारला २२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिला. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी ही मागणी केली होती; मात्र ही मागणी सत्ताधारी सदस्यांना अमान्य झाल्याने त्यांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

खासदार राहुल शेवाळे

विधान परिषदेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या की, खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडेही बलात्कारपीडित महिलेने तक्रार केली आहे; मात्र पोलिसांचा पीडितेवर दबाव आहे. पीडित तरुणीला मुंबईत यायचे आहे; मात्र दबावामुळे ती येऊ शकत नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. या पीडित तरुणीच्या जीविताला धोका आहे. ‘एस्.आय.टी. स्थापन करून राहुल शेवाळे यांची चौकशी करावी’, अशी मागणी त्यांनी केली.

विधान परिषदेत दोन्ही बाजूकडून झालेला गोंधळ शांत करण्यासाठी, तसेच सदस्या मनीषा कायंदे यांनी केलेल्या मागणीवरून सरकारकडून ‘एस्.आय.टी.’च्या चौकशीविषयी ठोस उत्तर दिले जात नव्हते. त्यामुळे स्वतःकडील अधिकाराचा वापर करत सरकारला निर्देश दिले आहेत, असे सभापती नीलम गोर्‍हे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभापतींचे निर्देश मान्य करून शेवाळे यांची चौकशी करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.