विधान परिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित !
नागपूर – विधान परिषदेत २२ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर विदर्भातील संत्रे आणि मोसंबी पिकांच्या हानीविषयी लक्षवेधीवर चर्चा चालू असतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलायला उभे राहिल्यानंतर सत्ताधारी नेते गोपीचंद पडळकर यांनी दानवे यांना ‘ये खाली बस’, असे बोलल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तालिका सभापतींनी १५ मिनिटांसाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित केले.
गोपीचंद पडळकर यांच्या विधानाला शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे आक्षेप घेत म्हणाल्या, ‘‘पडळकर यांना असे बोलणे शोभत नाही. विरोधी पक्षनेत्यांनी एकेरी भाषेत बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी क्षमा मागावी.’’ या वेळी सर्व विरोधी सदस्य आक्रमक झाले. याच सूत्रावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादावादी झाली.
सभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी ‘अशा एकेरी भाषेत बोलू नये. हा भाग कामकाजातून काढून टाकण्यात येईल’, असे सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सदस्यांनी संयम बाळगून कर्तव्य पार पाडले पाहिजे. चुकीच्या भाषेचा प्रयोग करू नये. मी सत्ताधारी सदस्यांना समज देतो. विरोधकांनीही संयम बाळगावा.