निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ११४
‘आयुर्वेदामध्ये एवढे सारे लिहिण्यासारखे असतांना तुम्ही केवळ ‘सकाळी अल्पाहार करू नका आणि त्या वेळेत व्यायाम करा’, असे का लिहिता ?’, असा प्रश्न एकाने मला विचारला. याचे उत्तर असे आहे. ‘एकै साधे सब सधै ।’ म्हणजे ‘एक साध्य केले असता सर्व साध्य होते’, या उक्तीप्रमाणे केवळ एवढेच नित्यनेमाने आणि श्रद्धेने केले, तर असलेले रोग बरे होण्यास, तसेच नवीन रोगांचा प्रतिबंध होण्यास साहाय्य होते. एवढे मोठे काम या एका लहानशा कृतीने होत असल्याने ‘हे नियमित करणे पुष्कळ महत्त्वाचे आहे’, असे आयुर्वेदात तर सांगितले आहेच; पण मी प्रत्यक्षही अनुभवले आहे. ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्यातच मनुष्यजन्माचे सार्थक आहे. शरीर निरोगी असणे साधनेला अत्यंत पूरक असते. त्यामुळे ‘ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरील प्रत्येक साधकाने सकाळी अल्पाहार न करता त्या वेळेत व्यायाम करावा’, अशी माझी नम्र विनंती आहे. (मधुमेहाच्या रुग्णांनी ‘अल्पाहार सोडायचा असल्याने सकाळच्या मधुमेहासाठीच्या गोळ्या किंवा इन्सुलिन कधी घ्यावे’, हे या क्षेत्रातील तज्ञ वैद्य किंवा आधुनिक वैद्य यांना विचारून घ्यावे.)
यासंदर्भात काही अडचणी किंवा प्रश्न असतील, ते [email protected] या ई-मेल पत्त्यावर कळवावेत.
आजकाल केवळ बोलण्यानेही टंकलेखन होण्याची सुविधा भ्रमणभाषमध्ये असते. त्यामुळे सकाळचा अल्पाहार सोडता येत नसल्यास येणार्या अडचणी मांडाव्यात. तुम्ही अल्पाहार न करता त्या वेळेत व्यायाम करत असाल, तर त्याचे झालेले लाभही ई-मेलद्वारे कळवावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२२)