पंचगव्य – जठराग्नी आणि पचनशक्ती !

पांजरपोळ (पुणे) येथे आयोजित केलेल्या ‘कामधेनू महोत्सवा’च्या (विश्व गो परिषद २०२२)’ निमित्ताने…

१. पावसाळ्यात शरिरातील अग्नी दुर्बल होऊन पचनशक्ती अत्यंत मंदावणे

वैद्या नंदिनी भोजराज

‘पावसाळ्यात संपूर्ण सृष्टी पावसाच्या पाण्याने ताजीतवानी होऊन जाते. झाडाझुडपांना एक नवीन जीवन प्राप्त होते. याच ऋतूमध्ये जल हे महाभूत चहुबाजूने दृष्टीस पडते. त्याचा प्रभाव आपल्या शरिरावरही दिसून येतो. ‘ब्रह्मांडात आहे, तेच सूक्ष्म रूपात पिंडीमध्येही वास करते’, हा सृष्टीचा नियम आहे. पावसाळ्यात ढगांमुळे सूर्याच्या किरणांना भूमीपर्यंत पोचण्यात अडचण येते. वातारणात ऊन अल्प पडत असल्याने त्या काळात अग्नी तत्त्व अल्प प्रमाणात असते. आपल्या शरिरातील अग्नीही या काळात दुर्बल होतो आणि आपली पचनशक्ती अत्यंत मंद होते. धर्मशास्त्रातील व्रत आणि नियम यांच्याविषयी विचार केला, तर श्रावण मासात एक वेळ भोजन करण्याचे व्रत सांगितले आहे. श्रावण मासाचे आराध्य दैवत भगवान शिव आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती फारच आजारी असेल, तेव्हा त्याच्यासाठी ‘महामृत्यूंजय’ हा मंत्र केला जातो. जेव्हा मनुष्य मृत्यू पावतो, तेव्हा सामान्यपणे ‘तो व्यक्ती शांत झाला’, असे म्हटले जाते.

२. शरीर स्वास्थ्यासाठी पाचक अग्नी उत्तम असणे आवश्यक !

‘परिवर्तन करणे’, हे अग्नीचे कार्य आहे. याचा अर्थ जेव्हा कोणत्याही वस्तूचा अग्नीशी संपर्क होतो, तेव्हा त्याच्या मूळ रूपात परिर्वतन होते. आपल्या शरिरात सातत्याने प्रक्रिया चालू असते. आपण ज्या अन्नाचे सेवन करतो, तो आहार त्याच्या मूळ रूपात रक्तात प्रवेश करू शकत नाही. शरिराचा अग्नी त्याच्या मूळ रूपात परिर्वतन घडवून आणतो आणि अन्नाला मूळ रूपात आणूनच शरिराला देतो. याला ‘पाचक अग्नी’ असे म्हटले जाते. आपला पाचक अग्नी जेव्हा उत्तम असतो, तेव्हा शरिरासाठी आवश्यक असलेले परिर्वतन योग्य प्रकारे होते. परिणामी शरिराचे पोषण चांगले होते. आपल्याला आतल्या आत स्वस्थ आणि प्रसन्न वाटते.

३. अग्नी प्रदीप्त करण्यासाठी ‘गोघृत’ सेवनाचे महत्त्व

जेव्हा आपली पचनशक्ती दुर्बल होते, तेव्हा शरिराचा अग्नीही दुर्बल होतो. अशा वेळी आहाराचे योग्य पचन होण्यासाठी आहारासमवेत नियमितपणे ‘गोघृत’चे सेवन करणे आवश्यक आहे. गायीच्या तुपाला ‘अग्नीदीपक’ असेही म्हटले आहे. ज्याप्रमाणे निखार्‍यांवर तूप टाकल्याने अग्नी तीव्र होतो, त्याचप्रमाणे योग्य प्रकारे बनलेले गायीचे तूप ग्रहण केल्याने सेवन केलेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होऊन शरिराला बळ प्राप्त होते, म्हणजेच भोजनाचे नियम व्यवस्थितपणे पाळणे आवश्यक आहे.

४. शांत चित्ताने जेवण करावे आणि गोमूत्राद्वारे अग्नी वाढवण्याचे कार्य होणे !

प्रत्येक व्यक्तीची आहार ग्रहण करण्याची क्षमता भिन्न भिन्न प्रकारची असते. अर्थात् एकमेकांची तुलना करू नये. वयोमान, श्रम, मानसिक स्थिती आणि ऋतू यांनुसार प्रत्येकाचा पाचक अग्नी भिन्न भिन्न स्थितीत असू शकतो. भूक लागल्यावर आहार घेणे आवश्यक आहे. जेवण करतांना प्रसन्न चित्ताने एके ठिकाणी बसून शांतपणे जेवणाचा आनंद घेतला पाहिजे. दोन वेळा घेतलेल्या जेवणामध्ये अन्न पचायला अवधी मिळणे आवश्यक आहे. गोमूत्र हे उष्ण गुणात्मक आहे. ते अग्नी वाढवण्याचेही कार्य करते; परंतु आपली पचनशक्ती चांगली असतांना जेवणाची मात्रा अत्यल्प असली पाहिजे. गोमूत्र प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन घेण्याची आवश्यकता नाही; पण गोमूत्राचे सेवन चिकित्सकांच्या मार्गदर्शनानुसार करावे.

५. अन्नाचे पचन होण्यासाठी गोमूत्र अर्क, दही आणि ताक लाभदायक !

‘कामधेनू गोमूत्र अर्क’ हे गोमूत्राच्या माध्यमातून बनवलेले औषध आहे. ते अर्धा चमचा (२.५ मि.लि.) अर्धा कप पाण्यात मिसळून सकाळी १ वेळा उपाशी पोटी मासातील १५-२० दिवस घेऊ शकतो. काही व्यक्तींना तेवढीही मात्रा सहन होत नाही. त्याने शरिराची उष्णता अचानक वाढते. काही परिस्थितींमध्ये गोमूत्र सेवन करू नये. त्यामुळे चिकित्सकांचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. दहीही गुणाने उष्ण आणि अन्न पचवण्यासाठी लाभदायक आहे. गायीच्या दुधापासून बनलेले ताकही अन्न पचवण्यासाठी उत्तम ‘प्रोबायोटिक’ (स्वतःच्या आरोग्यासाठी हातभार लावणारे चांगले जीवाणू) आहे.

– वैद्या नंदिनी भोजराज, एम्.डी. (आयुर्वेद), विश्वस्त, गो विज्ञान अनुसंधान केंद्र, नागपूर

(साभार : मासिक ‘गोसंपदा’, सप्टेंबर २०२२)