एन्.डी.ए.मधील शौर्य चौक स्मारकाच्या कामाबद्दल प्रमोद कांबळे यांचा ‘कमांडेशन’ पुरस्काराने सन्मान !

श्री. मनोज पांडे यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना श्री. प्रमोद कांबळे (उजवीकडे)

नगर – पुणे येथील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (एन्.डी.ए.) येथे सिद्ध करण्यात आलेल्या शौर्य चौक निर्माणात योगदान दिल्याबद्दल नगरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्र शिल्पकार श्री. प्रमोद कांबळे यांचा लष्कराने ‘कमांडेशन’ पुरस्काराने सन्मान केला आहे. चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल श्री. मनोज पांडे यांनी कांबळे यांची कलाकृती पाहून जागेवरच त्यांना ‘कमांडेशन’चे पदक घोषित करून ते प्रदान केले. नागरी क्षेत्रातील लोकांचा अपवादात्मक परिस्थितीत हा सन्मान केला जातो. तो श्री. कांबळे यांना मिळाला आहे. व्हाईस ॲडमिरल श्री. अजय कोच्चर यांच्या हस्ते श्री. कांबळे यांचा स्मृतीचिन्ह (‘ट्रॉफी’) देऊन सत्कार करण्यात आला. श्री. प्रमोद कांबळे हे ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक असून हिंदु जनजागृती समितीच्या अनेक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो.

या सन्मानाबद्दल बोलतांना श्री. प्रमोद कांबळे म्हणाले, ‘‘भारतीय लष्करासाठी काम करतांना नेहमीच पुष्कळ आनंद होतो. ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ तीनही सेना दलांसाठी अधिकारी घडवणारी प्रतिष्ठित संस्था आहे. सध्याचे देशाच्या तीनही सैन्य दलांचे प्रमुख हे वर्ष १९६१ च्या ‘बॅच’चे सहकारी आहेत. हा एक अनोखा योगायोग आहे. त्यांनी एकत्रित एन्.डी.ए.चा दौरा निश्चित केला होता. यानिमित्त एक स्थायी स्मारक बनवण्याचे ठरवण्यात आले. यासाठी लष्करी प्रशासनाने मला आकर्षक मॉन्युमेंट सिद्ध करण्यास सांगितले. त्यानुसार मी स्मारक साकारले. नागरी क्षेत्रात ज्याप्रमाणे पद्म पुरस्कारांचे महत्त्व आहे, तसेच ‘कमांडेशन’ पुरस्काराचे लष्करात महत्त्व असते. देशाच्या लष्कराकडून झालेला हा सन्मान माझ्या कलाक्षेत्रातील योगदानाचा सन्मान असल्याचे मी मानतो.’’

श्री. प्रमोद कांबळे यांनी नगरमध्येही एम्.आय.आर्.सी. या लष्करी संस्थेसाठी कलेतून योगदान दिले आहे. एम्.आय.आर्.सी.च्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला होता, तसेच ‘एसीसी अँड एस्.’ या लष्करी संस्थेकडूनही उत्कृष्ट शिल्पासाठी त्यांचा सन्मान केला आहे.