कर्नाटक सरकार हलाल मांसावर बंदी घालणारे विधेयक मांडणार !

जगातील अनेक देशांत हलाल मांसावर बंदी !  

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकार त्याच्या विधीमंडळाच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हलाल मासांवर बंदी घालणारे विधेयक मांडणार आहे. या विधेयकाला विरोधी पक्षांकडून आतापासूनच विरोध केला जात आहे. या विधेयकाद्वारे ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅक्ट २००६’मध्येही पालट करण्यात येणार आहे. त्याद्वारे कोणत्याही खासगी संस्थेला अन्न प्रमाणपत्र देण्यावर बंदी घातली जाणार आहे. त्यामुळे हलाल प्रमाणपत्रावरही बंदी येणार आहे. जर हा कायदा संमत झाला, तर कर्नाटक देशातील हलाल मांसावर बंदी घालणारे पहिले राज्य ठरील. कर्नाटकमध्ये एप्रिल मासात हलाल मासांवरून वाद झाला होता. हिंदु संघटनांनी हिंदूंना राज्यातील उगादी (नववर्ष) उत्सवाच्या वेळी हलाल मांस खरेदी न करण्याचे आवाहन केले होते.

जगात बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, स्पेन, सायप्रस, ऑस्ट्रिया आणि ग्रीस या देशांमध्ये हलाल मांसावर बंदी असणारा कायदा आहे. जगात हलाल मासांची निर्यात करणार्‍या देशांमध्ये काही मुसलमानेतर देशही आहेत, ज्यात ब्राझिल, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, चीन आणि भारत यांचे नाव आहे.