आमदार सौ. सरोज अहिरे-वाघ स्वतःच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला उपस्थित !

बाळासमवेत मतदारसंघातील प्रश्नही महत्त्वाचे आहेत ! – सौ. सरोज अहिरे-वाघ

बाळाला घेऊन अधिवेशनाला उपस्थित असणार्‍या आमदार सौ. सरोज अहिरे-वाघ

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – १९ डिसेंबरपासून चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या स्वतःच्या अडीच मासांच्या बाळाला घेऊन पती दंतरोगतज्ञ डॉ. प्रवीण वाघ आणि कुटुंबीय यांसह विधानभवनात पोचल्या. या वेळी सर्वांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले.

पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘मी आई असून आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याविना राहू शकत नाही; मात्र माझे कुटुंबीय माझ्यासमवेत आले असून ते बाळाची काळजी घेतील, तेव्हा मी मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडणार आहे; कारण हे प्रश्नही महत्त्वाचे असल्याने मला बाळाला घेऊन यावे लागले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या बाळाचे नाव ‘प्रशंसक’ असे आहे.