नामजप करतांना साधिकेला शिव-पार्वती यांचे स्मरण होऊन त्यांच्या नृत्याच्या मुद्रेचे चित्र आपोआप रेखाटले जाणे आणि चित्र काढतांना आनंद जाणवणे

१. ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करतांना शिव-पार्वती यांचे स्मरण होणे आणि त्यांनी केलेले नृत्य पाहिल्यावर मनाला शांतीची स्पंदने जाणवणे

कु. रजनीगंधा कुर्‍हे

‘२३.९.२०२२ या दिवशी मी सकाळी ११ वाजता रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी मला शिव-पार्वती यांचे स्मरण झाले. तेव्हा शिव-पार्वती यांचे ‘महाकाल’ आणि ‘महाकाली’ स्वरूप डोळ्यांसमोर आले. काही काळानंतर ‘महाकाल’ आणि ‘महाकाली’ यांचे स्वरूप शिव-पार्वती यांच्या रूपात परिवर्तित झाले. नंतर शिव-पार्वती यांनी नृत्य केले. ते नृत्य पाहिल्यावर मला शांतीची स्पंदने जाणवली.

२. ‘देवाने सांगितले आहे, तर तोच चित्र काढून घेईल’, असा विचार करून चित्र काढायचे ठरवणे

कु. रजनीगंधा यांनी रेखाटलेले शिव-पार्वतीचे चित्र

शिव-पार्वती यांचे नृत्य पूर्ण झाल्यावर दोघांनी एक मुद्रा केली. शिव-पार्वती यांनी मला सांगितले, ‘‘आमच्या या मुद्रेचे चित्र काढ.’’ त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘दोघांच्या नृत्याच्या या मुद्रेचे चित्रांकन कसे करता येईल ?; कारण मला तेवढे चांगले चित्र काढता येत नाही. तेव्हा ‘देवाने सांगितले आहे, तर तोच चित्र काढून घेईल’, असा विचार करून मी चित्र काढण्याचे ठरवले.

३. ‘चित्र काढायला चांगला कागद नाही’, असा विचार मनात आल्यावर देवानेच ‘सूक्ष्मातून कागद कुठे आहेत’, हे दाखवणे

‘माझ्याकडे चित्र काढायला चांगला कागद नाही’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर खोलीतील कपाटात एक (फाईल) धारिका असून तिच्यात कागद आहे’, असे चित्र डोळ्यांसमोर आले. देवाने मला सांगितले, ‘यात कागद आहेत. तू बघ.’ त्यानंतर प्रत्यक्षातही त्यात जुने २ – ३ कोरे कागद मिळाले.

४. शिव-पार्वती यांच्या नृत्याच्या मुद्रेचे चित्र आपोआप रेखाटले जाणे आणि चित्र काढतांना ईश्वराशी अनुसंधान जाणवून आनंद जाणवणे

‘शिव-पार्वती यांच्या नृत्याच्या मुद्रेचे चित्र रेखाटायचे असतांना ‘आरंभ कसा करू?’, हे मला कळत नव्हते. त्यानंतर माझ्याकडून शिवाच्या डोक्यापासून खांद्यापर्यंतचा भागही आपोआप रेखाटला गेला. त्याचप्रमाणे ‘पार्वतीच्या डोक्यापासून खांद्यापर्यंतचा भाग रेखाटला गेला’, अशा प्रकारे प्रथम शिवाचे चित्र त्या समवेत पार्वतीचे चित्र टप्प्याटप्प्याने काढले गेले. हे चित्र रेखाटतांना मी ईश्वराच्या अनुसंधानात असून मला आनंद जाणवत होता.

५. चित्राकडे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. चित्र रेखाटून झाल्यावर ‘त्या चित्राकडे बघत रहावे’, असे मला वाटत होते. ‘दोघांचीही मुद्रा केवळ त्यांच्या भक्तांना अभय प्रदान करणारी असून ते जगताचे माता-पिता आहेत’, असे मला वाटते.

आ. मला या चित्रातील शिव-पार्वती यांच्या मुखावर भाव जाणवला. मला शिवाच्या मुखाकडे पाहिल्यावर अधिकाधिक निर्गुण तत्त्व आणि शांती यांची स्पंदने जाणवली, तसेच माता पार्वतीच्या मुखाकडे पाहिल्यावर शक्ती अन् आनंद यांची स्पंदने अधिक जाणवली.

इ. ते सर्व सजीव-निर्जीव गोष्टींचे निर्माते आहेत. त्यामुळे ‘चित्रातील दोघांची देहमुद्रा (छायाचित्र बाजूला दिले आहे.) ही त्यांची येणार्‍या आपत्काळानंतर पुन्हा हिंदु राष्ट्र स्थापन करण्याकरता नवीन पिढी घडवण्याची मुद्रा आहे’, असे मला वाटले.

ई. त्या वेळी माझ्या मनाला एक वेगळी शांती जाणवत होती.

६. चित्र रेखाटून झाल्यावर साधिकेच्या मनात आलेला विचार

हे सर्व अनुभवल्यावर माझ्या मनात पुढील विचार आला, ‘श्रावण मास चालू होण्यापूर्वी दोन दिवस आधी मला ‘महाकाली’ आणि ‘महाकाल’ यांचे दर्शन झाले होते आणि आता नवरात्र चालू होण्यापूर्वी त्यांनीच शिव-पार्वती यांच्या रूपात दर्शन दिले.

७. ‘चित्र स्वतः रेखाटत नसून देवच रेखाटून घेत आहे’, असे जाणवणे

मी चित्र रेखाटतांना माझ्या मनात अन्य विचार नव्हते. ‘सर्व काही ईश्वरेच्छेने आपोआप घडले’, असे मला प्रकर्षाने जाणवले. मला हे चित्र रेखाटायला अनुमाने ५० ते ५५ मिनिटे लागली. या वेळेत खोडरबरचा वापरही अत्यल्प प्रमाणात झाला. ‘मी हे चित्र रेखाटत नसून देवच माझ्याकडून रेखाटून घेत आहे’, असे मला जाणवले.

८. शिव-पार्वती यांच्या संदर्भात दृश्य दिसण्यापूर्वी मनाची स्थिती

हे दृश्य दिसण्यापूर्वी माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. माझ्या मनात अनेक विचार होते.

मी चित्र रेखाटल्यानंतर माझ्या मनाची स्थिती पूर्णतः पालटली. मला देवाने जणूकाही आनंदावस्थेची भेटच दिली.

कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे गुरुमाऊली, माझी काहीच पात्रता नसतांना तुम्ही देवतांची दृश्ये दाखवता. संबंधित चित्र रेखाटूनही घेता आणि आनंद मात्र मला देता. याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. केवळ शरणागतभावाने एकच प्रार्थना करते, ‘माझ्या मनात आपल्या चरणांप्रती आपल्याला अपेक्षित असा अखंड कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव जागृत राहू द्या’, हीच आर्त प्रार्थना !’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक