देवता आणि संत यांना शिव्या देणारे कोणत्या तोंडाने मोर्चा काढतात ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, हे ठाऊक नाही. जे लोक देवता आणि संत यांना शिव्या देतात. जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, अशी मंडळी कोणत्या तोंडाने मोर्चा काढत आहेत ? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ मोर्च्याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना उपस्थित केला.

श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात महापुरुषांचा अवमान कुणीच करू नये आणि कुणी करत असेल, तर ते योग्य नाही, अशीच स्पष्ट भूमिका आम्ही वारंवार घेतली आहे. त्यामुळे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. मुद्दे संपले की, अशा कारणांवर मोर्चे काढले जातात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा वाद काही आमचे सरकार आल्यावर चालू झालेला नाही. ‘सीमाप्रश्नाला काँग्रेस उत्तरदायी आहे’, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे. महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेला मोर्चा राजकीय होता. या मोर्च्यासाठी आम्ही आझाद मैदानात अनुमती दिली होती; मात्र उपस्थिती न्यून असल्यामुळे मोर्च्यासाठी निमूळता रस्ता निवडण्यात आला.’’

 (सौजन्य : News18 Lokmat)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान अनेक वेळा काँग्रेसने केला, तेव्हा तुम्ही मोर्चा का नाही काढला ? सावरकर मोठे नाहीत का ? राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. आज हे तीन पक्ष विसरलेत की, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्न हा काही हे सरकार आल्यावर चालू झालेला नाही. गेली ६० वर्षं तो आहे. या लोकांनी राज्य केले, तेव्हा त्यावर काही केले नाही. मोर्चा तर ‘नॅनो’ झाला. विराट मोर्चा होईल, असे सांगितले होते. आझाद मैदान भरणारा मोर्चा असायला हवा होता; पण मोर्चा अपयशी ठरला, हे संख्येवरून दिसत आहे. त्यामुळे हा राजकीय मोर्चा होता.