कोल्हापूर, १५ डिसेंबर (वार्ता.) – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने पत्रकार परिषद, आंदोलन, लोकप्रतिनिधींच्या भेटी यांसह विशाळगडावर झालेले अतिक्रमण पुराव्यांसहित समोर आणले. यानंतर जिल्हाधिकारी, तसेच विविध विभागांचे अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सर्वांनीच हे अतिक्रमण झाल्याचे मान्य केले.
यानंतर संबंधितांना नोटिसा काढण्यात आल्या. नोटिसा निघाल्यानंतरही पावसाळ्याचे कारण पुढे करत जिल्हाधिकार्यांनी कारवाई करू शकत नाही, असे सांगितले. या कालावधीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही त्यांच्या स्तरावर हा विषय लावून धरला आणि छत्रपती संभाजीराजे आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीनंतर ही कारवाई चालू झाली.
सर्व गडांवरील अतिक्रमण शासनाने त्वरित हटवाव! pic.twitter.com/vZ8KkLpQIm
— Manojkumar Khadye (@manojkhadyehjs) December 15, 2022
विशाळगडावरील अतिक्रमण हे कुणाचाही मुलाहिजा न बाळगता हटवणे अपेक्षित आहे. त्याच समवेत ज्या ज्या अधिकार्यांच्या कालावधीत हे अतिक्रमण झाले ते पुरातत्व विभागाचे अधिकारी किंवा संबंधित प्रशासनाचे जे अधिकारी यांच्यावरही दिरंगाई केल्याविषयी कारवाई व्हावी, तसेच जे अधिकारी सेवानिवृत्त झाले त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून हानीभरपाई वसूल करावी, अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी १५ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
गडावर ३-३ मजले बांधकाम होतांना संबंधित प्रशासकीय अधिकारी काय करत होते ? – मनोज खाडयेगडावर जे अतिक्रमण झाले आहे त्यात काही घरांना बँकांनी कर्जरूपाने पैसे दिले आहेत. मुळात जे बांधकामच अवैध आहे त्यांना बँकेच्या अधिकार्यांनी कर्ज कसे काय संमत केले ? त्यामुळे अशा ज्या ज्या बँका आणि संबंधित अधिकारी यांनी ज्यांना ज्यांना ते संमत केले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे; पण त्यांच्याकडून हे पैसे वसूलही केले पाहिजेत. ज्या गडावर बांधकाम करण्यास तीनपट खर्च होतो, त्या गडावर तीन-तीन मजले बांधकाम होतांना संबंधित प्रशासकीय अधिकारी काय करत होते ? गडावर १५ कूपनलिका (बोअर) करण्यात आल्या आहेत. यांना कुणी संमती दिली ? तरी यातील प्रत्येकाशी संबंधित असणार्या अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे. |
या प्रसंगी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे सदस्य सर्वश्री प्रमोद सावंत, किशोर घाटगे, राजू यादव, रणजित घरपणकर, बाबासाहेब भोपळे, किरण दुसे उपस्थित होते.
विशाळगडवर पुरातन वास्तूंचे संवर्धन करतांना प्रचंड अडचणी ! – रणजित घरपणकर, अध्यक्ष, मराठा तितुका मेळावावा
या प्रसंगी कृती समितीचे सदस्य आणि मराठा तितुका मेळवावा संघटनेचे अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर म्हणाले, ‘‘आम्ही जेव्हा विशाळगडावर संवर्धनाचे काम चालू केले तेव्हा एकाही वास्तूंना तिथे साधा नामफलकही लावण्यात आलेला नव्हता. आम्ही मंदिरांचे संवर्धन चालू केल्यावर त्या मंदिरांमधील देवतांच्या मूर्ती धर्मांध दरीत टाकूत देत, हे अनेक दिवस चालू होते. आम्ही विशाळगडावर माहिती देणारे सर्व फलक लावले, ठिकठिकाणी मार्ग दिसण्यासाठी पिवळ्या रंगाचे फलक लावले. या फलकांचे समाजकंटकांकडून विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाला. ज्यामुळे काहीतरी वाद निर्माण व्हावा, असे प्रयत्न केले. वाघजाई मंदिरासाठी आम्ही सौरउर्जेवर चालणार दिवा लावला. त्याची तोडफोड करण्यात आली. आम्हाला मंदिराचा एखादा नामफलक लावण्यासाठी साधा २ फुटाचा खड्डा मारायचा झाला, तर पुरातत्व विभागाची अनुमती घेतांना नाकीनऊ येत होते ? याउलट तिथे तिथे दोन-दोन मजली इमारती उभारण्यात आल्या, हे कसे काय शक्य होते ? गडावर प्रत्येकी १२५ फुटाचे १७ बोअर कसे काय मारले जातात ? तरी या संदर्भात जे जे उत्तरदायी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.’’
क्षणचित्रआजच्या पत्रकार परिषदेसाठी विविध वृत्तपत्रे, तसेच वृत्तवाहिन्या, वेबपोर्टल यांचे ३१ पत्रकार उपस्थित होते. |