धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली गेलेले आहेत. दत्त जयंतीनिमित्त पुणे येथील ‘श्री स्वामी समर्थ सेवासार संघा’च्या वतीने श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात केक कापून दत्त जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. आजवर सामान्य जनता पाश्चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले; पण आता मात्र पाश्चात्त्यांच्या अनुकरणाची परिसीमा झाली आहे.
मंदिर समिती आणि मंदिरातील पुजारी यांनी स्वतः धर्माचा सखोल अभ्यास करून सामान्य जनतेला धर्मशिक्षण देऊन धर्माविषयी जागृत करणे अपेक्षित आहे. असे असतांना त्यांनीच पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण अन् तेही भारतात देवतांच्या जन्मोत्सवानिमित्त करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्यांनी धर्मानुसार आचरण करून सामान्यांना धर्म शिकवणे, धर्माचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवणे, हिंदु धर्माची महानता आणि अतीप्राचीनता पटवून देणे, असे करणारेच परकीय विकृतीकडे आकर्षित होऊन धर्मद्रोही आचरण करत असतील, तर ‘कुंपणच शेत खाते !’, ही म्हण सार्थ ठरते. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे, ‘धर्माे रक्षति रक्षित: ।’ म्हणजेच धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो. धर्मद्रोह करून आपणच आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो.
हिंदु संस्कृतीनुसार शुभकार्यामध्ये अन्नावर सुरी किंवा चाकू फिरवणे, मेणबत्ती विझवणे अशुभ असते; मात्र पाश्चात्त्य याला महत्त्व देतात. हिंदु संस्कृतीमध्ये अन्नाला ‘अन्नब्रह्म’ म्हटले आहे. अन्नरूपी ब्रह्माची उपासना करतांना त्यावर सुरी फिरवणे तामसिक आहे. हिंदु संस्कृती तिमिरातूनी तेजाकडे म्हणजेच तमकडून सत्त्वकडे प्रवास करायला शिकवते; मात्र पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण उलट दिशेने प्रवास करत आहोत.
भगवान दत्तात्रेय उच्चकोटीची देवता आहे. त्यांच्या जन्मदिनी देवतेचे तत्त्व पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्याचा लाभ होण्यासाठी देवतांचे जयंती-उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे त्या दिवशी देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात ग्रहण करता येण्यासाठी त्या देवतेची उपासना करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना भारत भूमीत अधर्माचरण रूजवून जे साध्य करता आले नाही, तेच आज स्वातंत्र्यानंतर सहज साध्य होतांना दिसत आहे. यामुळे हिंदूंची आध्यात्मिक स्तरावर मोठी हानी होत आहे. यातूनच हिंदु राष्ट्राची आवश्यकता अधोरेखित होते !
– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.