संतांचा देह अग्निसमर्पित केला, तरी त्यांचे चैतन्य कार्यरत रहाणे

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

जिज्ञासूचा प्रश्न

प्रश्न : संतांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या देहाचे दहन न केल्यास चांगले होईल; कारण त्यांच्या देहातून पुढील एक सहस्र वर्षे वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होते. काही पंथांमध्ये संतांचा देह दफन करून ठेवतात. तरी या संदर्भात नेमके शास्त्र काय आहे ?

उत्तर

१. संतांनी देहत्याग केल्यानंतर ‘त्यांचे चैतन्य पृथ्वीवर किती काळ टिकणार ?’, याचा कालावधी प्रत्येक संतांच्या संदर्भात वेगवेगळा असणे

जगात अनेक संत असतात; परंतु प्रत्येक संतांचा साधनामार्ग, त्यांचे पृथ्वीवरील कार्य, त्यांचा आध्यात्मिक स्तर, त्यांच्या सिद्धी, त्यांची शक्ती इत्यादी गोष्टींमध्ये पुष्कळ प्रमाणात भेद असतो. त्यामुळे काही संतांनी देहत्याग केल्यावर त्यांचे चैतन्य पृथ्वीवर काही शे वर्षे टिकते, तर काहींचे त्यापेक्षा अल्प अथवा अधिक काळ टिकते. हा कालावधी प्रत्येक संतांच्या संदर्भात वेगवेगळा असतो. सर्वांसाठी तो एक सहस्र वर्षे एवढाच असतो, असे नाही.

२. संतांच्या देहत्यागानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धतींत वैविध्य असणे

‘संतांनी देहत्याग केल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार कसे करावेत ?’, हे एकतर त्यांच्या साधनामार्गानुसार परंपरेने ठरलेले असते किंवा देहत्यागापूर्वी संतांनी स्वतःच त्याविषयी मार्गदर्शन केले असते किंवा त्यांच्या देहत्यागानंतर त्यांचे उत्तराधिकारी अथवा शिष्योत्तम त्याविषयी निर्णय घेतात. अन्य कुणी याविषयी काही ठरवणे धर्मशास्त्रानुसार योग्य नाही. सर्वसाधारणपणे संतांचे अंत्यसंस्कार पुढील तीन प्रकारे केले जातात.

अ. देह भूमीमध्ये दफन करणे

आ. देह वहात्या पाण्यात विसर्जित करणे

इ. देह अग्नीस समर्पित करणे

सहसा संन्याशांचे देह भूमीमध्ये दफन केले जातात किंवा वहात्या पाण्यात विसर्जित केले जातात.

३. ‘संतांचा देह अग्निसमर्पित केला की, तो नष्ट होतो आणि त्यामुळे त्यांचे चैतन्यही नाहीसे होते’, हा अपसमज असणे

३ अ. संतांचा स्थूलदेह नष्ट झाला, तरी त्यांचे चैतन्य आणि त्यांची शक्ती नष्ट होत नसणे : देहत्यागानंतर संतांचा स्थूलदेह अग्नीस समर्पित केला आणि तो नष्ट झाला, तरी त्यांचे चैतन्य अन् त्यांची सूक्ष्म शक्ती नष्ट होत नाही. संतांच्या साधनेनुसार विशिष्ट कालावधीपर्यंत या दोन्ही गोष्टी पृथ्वीवर रहातात. त्यामुळेच कित्येक संतांच्या देहत्यागानंतर त्यांचे देह अग्नीस समर्पित केले, तरीही त्या संतांविषयी त्यांच्या भक्तांना पुढील कितीतरी वर्षे अनुभूती येत रहातात.

३ आ. संतांवर कोणत्याही प्रकारे अंत्यसंस्कार केले, तरी त्यामुळे त्यांच्या भक्तांना त्या संतांविषयी येणार्‍या अनुभूतींत कोणताही पालट न होणे : संतांचा देह अग्नीत समर्पित केला, भूमीत दफन केला किंवा जलसमर्पित केला, तरी त्या कारणामुळे त्यांच्याविषयी भक्तांना अनुभूती येण्याच्या कालावधीत वाढ अथवा घट होत नाही. त्याचप्रमाणे अनुभूतींच्या स्तरांतही काही पालट होत नाही. संत देहात असतांना त्यांच्या भक्तांना त्या संतांविषयी जशा अनुभूती येतात, तोच प्रवास संतांच्या देहत्यागानंतर त्यांचा देह अग्नीसमर्पित केल्यावरही चालू रहातो.

– सुश्री (कुमारी) सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०२२)