मुंबई – राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी १३ डिसेंबर या दिवशी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत ७० सहस्र कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या गुंतवणुकीमुळे राज्यात ५५ सहस्र रोजगारांची निर्मिती होणार आहे. गडचिरोलीमध्ये २० सहस्र कोटी रुपयांच्या स्टील प्रकल्पासही मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या मुख्य प्रकल्पांसोबतच इतर अन्य प्रकल्पांसह राज्यात ७०,००० कोटींची गुंतवणूक व सुमारे ५५००० एवढी रोजगार निर्मिती होणार आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 13, 2022
१. विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर यांसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये ३ मोठे प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीने मान्यता दिली. यामध्ये हरित तंत्रज्ञानावर आधारित ‘मे. न्युईरा क्लिनटेक सोल्युशन्स प्रा. लि.’ या घटकाचा चंद्रपूर येथे ‘कोल गॅसिफिकेशन प्रकल्पाचा (हरित हायड्रोजन, मिथेनॉल, अमोनिया आणि युरिया आदीचा समावेश असलेला) आहे.
२. देशाच्या आणि राज्याच्या ‘इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसी’नुसार देशातील ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ निर्मितीच्या क्षेत्रातील १० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ‘महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल्स’ पहिला प्रकल्प पुणे येथे चालू होणार आहे. या माध्यमातून राज्यात विदेशी गुंतवणूक होणार आहे.
३. ‘निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रा. लि.’ या आस्थापनाला मान्यता देण्यात आली. हे आस्थापन पुणे येथे चालू होणार असून यातून १ सहस्र ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
४. रिलायन्स लाईफ सायन्स नाशिक आस्थापनाच्या ४२०६ कोटी प्रस्तावित गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली आहे. हे आस्थापन प्लाझा प्रोटीन, व्हॅक्सीन आणि जीन थेरपी आदी जीवरक्षक औषधांची निर्मिती करणार आहे. हा आयात पर्यायी प्रकल्प असणार आहे.