बंगालमध्ये गीता जयंतीनिमित्तच्या रथयात्रेवर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांचे आक्रमण ! – भाजपचा आरोप

  • अनेक जण घायाळ

  • गुन्हा नोंदवण्यास पोलिसांचा नकार

  • आक्रमणकर्त्यांना विरोध कणार्‍या हिंदूंवरच पोलिसांकडून लाठीमार

दक्षिण २४ परगणा (बंगाल) – येथील बेटबेरिया भागात प्रतिवर्षी गीता जयंती साजरी केली जाते. यावर्षी ११ डिसेंबर या दिवशी गीता जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या  रथयात्रेवर काही जणांनी आक्रमण केले. यात काही हिंदू घायाळ झाले, अशी माहिती भाजपचे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते आमदार शुभेंदु अधिकारी यांनी दिली. या आक्रमणामागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याचेही त्यांनी सांगितले.

१. आमदार अधिकारी यांनी ट्वीट करत सांगितले की, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी प्रथम रस्ता बंद करून रथयात्रा रोखली. त्यानंतर लोखंडी सळी, तलवार आणि काठ्या यांद्वारे रथयात्रेत सहभागी भक्तांवर आक्रमण केले. हे सर्व नियोजनबद्धरित्या करण्यात आले. यात काही जणांना गंभीर दुखापत झाली. आक्रमणकर्त्यांना विरोध कणार्‍या हिंदूंवरच पोलिसांनी लाठीमार केला. बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था इतकी वाईट आहे की, भक्त रथयात्राही काढू शकत नाहीत ?, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

२. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनीही ‘या आक्रमणामागे तृणमूल काँग्रेसचे समर्थक होते. त्यांच्या हातात तृणमूल काँग्रेस पक्षाचा झेंडा होता’, असा आरोप केला.

संपादकीय भूमिका

आणखी किती दिवस बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदू मार खात रहाणार आहेत ? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे धाडस कधी दाखवण्यात येणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !