कर्नाटकातील मंदिरांमधील ‘सलाम आरती’ला आता ‘संध्या आरती’ संबोधले जाणार !

  • हिंदु संघटनांच्या मागणीला यश

  • टिपू सुलतानमुळे म्हटले जात होते ‘सलाम आरती’ !

मेलकोटे (कर्नाटक) – येथील ऐतिहासिक चालुवनारायण स्वामी मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये टिपू सुलतानच्या काळापासून सांज आरतीच्या वेळी होणार्‍या आरतीला ‘सलाम आरती’ असे म्हटले जात होते. या आरतीचे नाव पालटण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात आल्यावर आता तिला ‘संध्या आरती’ असे संबोधले जाणार आहे. राज्यातील धर्मादाय विभागाने याला संमती दिली आहे. गेल्या ६ मासांपासून हा विषय या विभागाकडे प्रलंबित होता. आता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडून अंतिम संमती मिळणे शेष आहे. टिपू सुलतानच्या नावाने केले जाणारे विधी रहित करण्याचीही मागणी या संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. टिपू सुलतान याने या मंदिराला दिलेल्या भेटीमुळे आरतीला ‘सलाम आरती’ असे नाव दिले होते, असे सांगण्यात येते.

१. कर्नाटक धार्मिक परिषदेचे सदस्य कशेकोडी सूर्यनारायण भट यांनी म्हटले की, ‘सलाम’ हा शब्द टिपूने दिला होता, तो आमचा नाही.

२. भट यांच्या मते, कुक्के येथील श्री सुब्रह्मण्य मंदिर, पुत्तूर येथील श्री महालिंगेश्‍वर मंदिर, कोल्लूर येथील मुकांबिका मंदिर आणि इतर काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये ‘सलाम आरती’ होते. मंड्या जिल्हा प्रशासनाने नाव पालटण्याचा प्रस्ताव ‘हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय विभाग’ यांना सादर केला होता.

पूर्वी जे प्रचलित होते, ते आम्ही परत आणले ! – मंत्री शशिकला जोल्ले

याविषयी धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, ही फारसी नावे पालटून ‘मंगला आरती नमस्कार’ किंवा ‘आरती नमस्कार’ यांसारखी पारंपारिक संस्कृत नावे कायम ठेवण्याचे प्रस्ताव आणि मागण्या होत्या. इतिहास पहाता पूर्वी जे प्रचलित होते, ते आम्ही परत आणले आहे.

संपादकीय भूमिका

अशी मागणी हिंदु संघटनांना का करावी लागली ? सरकारने स्वतःहून यात पालट करणे अपेक्षित होते, असेच हिंदूंना वाटते !