‘आज भारताची राजधानी देहलीत आफताब अमीन पूनावालाने त्याची प्रेमिका आणि हिंदु युवती श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केल्याची घटना चर्चेत आहे. या घटनेमुळे परत एकदा देशात ‘लव्ह जिहाद’ची चर्चा चालू झाली. संतप्त हिंदूंकडून अनेक ठिकाणी निषेध आणि आंदोलने चालू आहेत, तसेच धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रसारित होणार्या बातम्यांमध्ये आफताब याने श्रद्धाखेरीज अन्य २० हिंदु मुलींनाही त्याच्या जाळ्यात फसवल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही, तर श्रद्धाचे तुकडे घरातील शीतकपाटात असतांना तो अन्य मुलींशी संबंध ठेवत होता. याला प्रेम म्हणता येईल का ?
त्याही पुढे जाऊन हत्येच्या अन्वेषणासाठी केलेल्या ‘पॉलीग्राफ’ (एका यंत्राचा उपयोग करून संशयित व्यक्तीकडून खोटे बोलले जात असल्यास सत्य जाणून घेण्यासाठी केलेली एक चाचणी) चाचणीत आफताब म्हणाला, ‘‘श्रद्धाच्या निर्घृण हत्येविषयी मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला फाशीची शिक्षा मिळाली, तरी जन्नतमध्ये (स्वर्गात) हुरें (सौंदर्यवती तरुणी) मिळतील.’’ या मारेकर्यांना आणि जिहाद्यांना जन्नतमध्ये जाण्याची खात्री कोण देतो ? २६/११ च्या मुंबई आक्रमणातील दोषी आतंकवादी कसाबच्या मानसिकतेहून आफताबची जिहादी मानसिकता वेगळी दिसून येते का ?
श्रद्धाची हत्या हे एकमेव प्रकरण नाही. त्यापूर्वी आणि नंतरही निधी गुप्ता, अंकिता सिंह, निकिता तोमर, काजल, मानसी दीक्षित, तनिष्का शर्मा, खुशी परिहार, वर्षा चौहान, हिना तलरेजा आदी हिंदु तरुणींसमवेतही अशाच प्रकारची क्रूरता झाली आहे. अनेक मुलींचे मृतदेह बंद सुटकेसमध्ये मिळाले आहेत. तरीही देशातील धर्मनिरपेक्षता वाद्यांनुसार हा ‘लव्ह जिहाद’ नाही, तर मग काय आहे ? याविषयी समजून घेऊया.
१. जिहाद ते लव्ह जिहाद आणि त्यासाठी केल्या जाणार्या क्लृप्त्या
जिहाद्यांनुसार संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापन करणे, म्हणजेच संपूर्ण जगाच्या ‘दार-उल-हरब’ (जेथे इस्लामचे शासन चालत नाही, असा प्रदेश) भूमीला ‘दार-उल-इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) बनवणे, हे त्यांचे धार्मिक कर्तव्य आहे. जोपर्यंत जगातील अंतिम व्यक्ती इस्लाम स्वीकारत नाही, तोपर्यंत त्यांचा संघर्ष, ‘जिहाद’ चालूच राहील. याच जिहादच्या मार्गावर हुतात्मा होणे सर्वाेच्च समजले जाते.
या जिहादच्या लक्ष्यप्राप्तीसाठी विविध मार्ग अनुसरले जात आहेत. इस्लामी आक्रमकांनी भारतावर आक्रमण करणे, मंदिरे तोडणे, लुटणे, पुरुषांची हत्या करणे, महिला आणि मुले यांना बंदी बनवून त्यांची बाजारामध्ये गुलाम म्हणून विक्री करणे किंवा त्यांना ‘हरम’मध्ये (बहिष्कृत क्षेत्रात) टाकणे, सुफींकडून इस्लामचा प्रचार करणे, छळकपट करून युद्ध करणे, इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी आमीष दाखवणे, लोकसंख्या वाढवणे, आतंकवादी आक्रमणे करून सरकारच्या विरोधात युद्ध छेडणे, हे सर्व जिहादचे सुपरिचित मार्ग आहेत.
‘पी.एफ्.आय.’चे (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे) ‘व्हिजन-२०४७ डॉक्युमेंट’ (वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्यासाठी करण्यात आलेले षड्यंत्र) याचाच भाग आहे. यातच मेजवानी देणे, अर्थात् ज्याला ‘इस्लाम स्वीकारण्यासाठी आमंत्रण’ समजले जाते, हेही येते. याच मेजवानीचा एक भाग आहे ‘लव्ह जिहाद !’ लव्ह जिहादमध्ये प्रेमाच्या सहज सुलभ भावनांचा वापर केला जातो. यासाठी युवावस्थेत निर्माण होणार्या भावनांचा तथा शारीरिक आकर्षणाचा उपयोग केला जातो. मासा पकडण्यासाठी ज्या प्रकारे काट्याला खाद्य लावले जाते, त्याचप्रमाणे मुसलमान युवक शाळा, महाविद्यालये आदींच्या बाहेर सजून महागड्या वाहनांनी येऊन हिंदु युवतींना प्रभावित करून फसवण्याचा प्रयत्न करतात.
या लव्ह जिहादच्या षड्यंत्रापासून अपरिचित, भोळ्या, आधुनिक तथा पाश्चात्त्य प्रभावामुळे हिंदु मुली त्यांच्या जाळ्यात सहजतेने फसतात. अनेक वेळा माध्यम म्हणून मुसलमान तरुणींचाही वापर केला जातो. मुसलमान तरुणी हिंदु मैत्रिणींना मुसलमान मुलांशी परिचय करून देण्याचे कार्य करतात. मोबाईल रिचार्ज सेंटर, शिकवणीवर्ग तथा आधुनिक जिम (व्यायाम) प्रशिक्षणवर्ग यांच्या माध्यमातून हिंदु तरुणींचे भ्रमणभाष क्रमांक मुसलमान तरुणांना दिले जातात तथा त्यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
नोव्हेंबर २०२२ मध्ये कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये सरिता नावाची हिंदु मुलगी खलीलच्या दुकानात भ्रमणभाष रिचार्ज करण्यासाठी जात होती. खलील याने तिच्याशी मैत्री करून तिला चांगली नोकरी देण्याचे आमीष दिले आणि तिचे धर्मांतर करून तिला सरितापासून आयेशा बनवले. त्यानंतर तिचे शोषण करणे चालू केले. या प्रकरणी सरिताने पोलीस तक्रार केली. त्यानंतर एका महिला डॉक्टरसह ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याविषयी जेथे हिंदूंमध्ये अज्ञान दिसून येते, तेथे मुसलमान समाज जागृत आहे. वर्ष २०१४ मध्ये मुसलमानांच्या ‘व्हॉट्सॲप’ गटात ‘मीम टू मीम’ (मुसलमानांपासून मुसलमानांपर्यंत) हा संदेश मुसलमान युवतींना केवळ मुसलमानांच्या दुकानांवरच भ्रमणभाष रिचार्ज करण्यास सतर्क करण्यासाठी पाठवला जात होता.
२. प्रेम आणि जिहाद यांमध्ये अंतर असणे
प्रेम ही एक त्याग आणि पवित्रता यांची भावना असते. प्रेमात एकमेकांच्या प्रती सत्यता आणि विश्वास यांचे नाते असणे आवश्यक आहे; परंतु मुसलमान युवक त्यांची अब्दुल, सलीम, सलमान अशी नावे लपवून हिंदु मुलींशी हिंदु नावाने मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. ते हाताला लाल धागा बांधून स्वत:ला हिंदु दाखवण्याचा प्रयत्न करतात. जर मनात प्रेमाची खरी भावना असेल, तर स्वत:चे खरे नाव लपवून बनावट (खोट्या) हिंदु नावे धारण करण्याची आवश्यकता काय ? जेथे मैत्रीचा प्रारंभच खोटारडेपणा आणि धोका यांनी होतो, तेथे प्रेमाची भावना कशी असू शकते ? अनेक प्रकरणांमध्ये लक्षात येते की, बहुतांश धर्मांध आधीच विवाहित असतात. त्यांना १-२ मुलेही असतात; परंतु इस्लाममध्ये असलेल्या ४ लग्न करण्याच्या सुविधेच्या आडून एका हिंदु तरुणीचे जीवन उद्ध्वस्त केले जाते. याला प्रेम म्हणता येईल का ? दोघांच्याही मनात खरे प्रेम असेल, तर दोघेही त्यांच्या त्यांच्या धर्माचे आचरण एकाच वेळी करू शकतात; परंतु असे न होता हिंदु तरुणीवर धर्मांतराची बळजोरी का केली जाते ? काय कारण आहे की, त्या युवतीला तिचा मूळ धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्यास सांगण्यात येते ? तिला बुरखा घालण्यासाठी आणि गोमांस खाण्यासाठी बळजोरी का करण्यात येते ? तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा सन्मान या प्रेमात का केला जात नाही ?
प्रत्येक गोष्टीत इस्लामप्रमाणे करण्याची बळजोरी करणे आणि त्याच्यासाठी अत्याचार करणे, हे प्रेम नाही, तर जिहाद आहे. तसेही ‘टिंडर’ आणि ‘बंबल’ यांसारख्या ‘ऑनलाईन डेंटिंग ॲप’वर घेण्यात येणारा शोध खर्या प्रेमाच्या भावनेने होत असल्याची शक्यता अल्पच असते. या ‘ॲप्स’वर खोटे ‘प्रोफाईल’ बनवून आणि खोटे छायाचित्र लावून वासनापूर्तीच्या हेतूने शोध घेणार्यांकडून प्रेमाची अपेक्षा करता येऊ शकते का ?
३. ‘माझा अब्दुल तसा नाही’, ही हिंदु तरुणींची मानसिकता धोकादायक !
भारतात जिहादी आतंकवादी ही नवीन गोष्ट नाही. श्रद्धा वालकरची हत्या ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी अशी अनेक उदाहरणे भारतात झाली आहेत; परंतु प्रत्येक वेळी हिंदु तरुणी बुद्धीने विचार न करता, त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे न ऐकता, तसेच यामागचे षड्यंत्र न समजून घेता भावनांमध्ये वहावत जाते. तिचे म्हणणे असते, ‘अन्य मुसलमानांमध्ये निश्चित दोष असतील; पण माझा अब्दुल तसा नाही !’ बस, याच ‘माझ्या अब्दुल’ची वास्तविकता समोर येईपर्यंत ती एवढी फसते की, जेव्हा अब्दुल तिच्या खासगी क्षणांचे चित्रण करतो, तेव्हाच तिला त्याचे वास्तविक स्वरूप समजते; पण वेळ निघून गेल्याने वास्तविकता समजूनही ती त्याच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही.
४. हिंदु तरुणींवर हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रभाव असणे
आज जीवनात वास्तवापेक्षा दिखाऊपणाला फार महत्त्व आले आहे. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलीदान देणार्या राष्ट्रपुरुषांहून सिनेमातील नट-नट्यांना अधिक महत्त्व मिळत आहे. त्यांचे महागडे छंद, गाड्या, फॅशन, गॉसिप (चर्चा), ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता तरुण-तरुणींनी एकत्र रहाणे) या सर्वांचा प्रभाव तरुण पिढीवर अधिक आहे. बॉलीवूडच्या काही लोकांनी ही स्थिती निर्माण केली आहे. सामान्य कुटुंबातील मुलींवरही याचा परिणाम होतो आणि त्यांना त्याच अभिनेत्यांसारखे जीवन जगावेसे वाटते. त्याचाच लाभ हे लव्ह जिहादवाले उठवतात. त्यानंतर मोठमोठी स्वप्ने दाखवून त्यांना जाळ्यात ओढले जाते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये १-२ वर्षे एकत्र राहून तिच्यापासून शारीरिक वासना पूर्ण झाल्यानंतर आणि दोघांमध्ये वाद चालू झाल्यानंतर तो त्याच प्रेमिकेला अडचण समजू लागतो. त्यानंतर एक दिवस तिची हत्या करण्याचे ठरवतो. लिव्ह इन रिलेशनशिपच्या शारीरिक संबंधांच्या संकल्पनेत विवाहाचे कोणतेही संस्कार आणि बंधने नसतात. हे हिंदु मुली समजत नाहीत आणि नंतर स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करून घेतात.
५. लव्ह जिहादींसाठी हिंदु तरुणी, म्हणजेच ‘माल-ए-गनिमत (लुटीतून मिळालेली संपत्ती)’ !
मध्ययुगीन कालखंडात जेव्हा जेव्हा भारतावर बिन कासीम, घोरी, गझनी, खिलजी, बाबर आदी इस्लामी आक्रमकांनी आक्रमण केले, तेव्हा प्रत्येक शहरात त्यांनी लूटमार करण्यासह काफीर समजल्या जाणार्या हिंदु महिलांशीही कल्पनातीत क्रूरता दाखवली. या सामूहिक दुष्कृत्यांनाच ‘माल-ए-गनिमत’, म्हणजेच लुटीतून मिळालेली संपत्ती मुसलमानांसाठी हलाल आहे, असे परिभाषित करण्यात आले आहे. या हिंदु महिलांना मुसलमानांच्या जनानखान्यात ‘सेक्स स्लेव्ह’ (संभोगासाठी गुलाम) म्हणून भरती करण्यात येत होते किंवा गुलामांच्या बाजारात त्यांची विक्री केली जात होती. अफगाणिस्तानमधील गझनी येथे हिंदु महिलांचा लिलाव झाला होता, त्या ठिकाणी मुसलमानांनी लिहिले आहे, ‘दुख्तरे हिन्दोस्तान, नीलामें दो दीनार’ म्हणजेच या ठिकाणी हिंदुस्थानी स्त्रियांचा दोन-दोन दीनारमध्ये (स्थानिक चलन) लिलाव करण्यात आला होता.
वर्ष १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळच्या गोष्टी असो किंवा वर्ष १९७१ च्या वेळेचा बांगलादेश युद्धाचा काळ असो, त्या वेळी लक्षावधी हिंदु महिलांवरील याच वाळवंटवाल्या मानसिकतेच्या अत्याचाराचे अनेक प्रसंग आजही सांगितले जातात. आजही पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये अल्पसंख्य हिंदु महिला अन् मुली यांच्याशी क्रूर वागणुकीच्या घटना समोर येत असतात. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना विस्थापित होण्यासाठी बाध्य करण्यात आले. त्या वेळी धर्र्मांधांची घोषणा होती, ‘आसी गच्च पनुन्यु पाकिस्तान, बटाव रोस्तुय बटेनियन सान’, म्हणजेच ‘आम्हाला काश्मिरी पंडितांखेरीज; पण पंडित महिलांसह आमचा पाकिस्तान हवा आहे !’
आज इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी यहुदी महिलांशी केलेल्या क्रूर अत्याचारांचे पुरावे उपलब्ध आहेत. जेव्हा त्यांची १ सहस्र ४०० वर्षांपासून हीच मानसिकता आहे, तर ते कुणा एका काफीर (हिंदु) मुलीशी प्रेम कसे करू शकतात ? त्यांना तर काफीर मित्राशी मैत्री करण्यासही प्रतिबंध केला जातो, तेव्हा प्रेम तर फार लांबची गोष्ट आहे. एक तर ते तिला ‘सेक्स स्लेव्ह’ समजतात किंवा इस्लामसाठी मुले जन्माला घालणारे यंत्र ! ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटनांमध्ये त्या हिंदु मुलीवर त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुषांकडून अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात, हा त्याचाच परिणाम आहे. गेल्या आठवड्यात २ डिसेंबर २०२२ या दिवशी महाराष्ट्राच्या धुळे येथे एका हिंदु महिलेशी अर्शद मलिक नावाच्या धर्मांध युवकाने लग्न केले. त्यानंतर त्याचे वडील सलीम मलिकही त्या महिलेवर बळजोरीने अनैसर्गिक अत्याचार करत होते. जेव्हा त्या महिलेने विरोध केला, तेव्हा त्यांनी तिला तिचे ७० तुकडे करण्याची धमकी दिली.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (५.१२.२०२२)
संपादकीय भूमिकामासा पकडण्यासाठी जसे काट्याला खाद्य लावले जाते, तसे मुसलमान तरुण हिंदू युवतींना प्रभावित करुन फसवतात ! |