१. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय यंत्रणांचे साहाय्य मिळण्यासाठी संबंधितांचे संपर्क क्रमांक माहिती असणे आवश्यक !
‘आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी शासनाने संबंधित यंत्रणांचे साहाय्य क्रमांक (हेल्पलाईन नंबर) उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला संबंधित यंत्रणांचे साहाय्य घेता येईल. या सर्व क्रमांकांवरील सेवा २४ घंटे उपलब्ध असतात. शासनाने निश्चित केलेल्या सर्व आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. ते आपल्या भ्रमणभाषवर संरक्षित करणे, तसेच आपल्याकडे नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. आपत्कालीन यंत्रणांचे साहाय्य क्रमांक बाजूच्या सारणीत दिले आहेत.
२. संबंधित प्रशासकीय यंत्रणांना संपर्क करतांना घ्यावयाची काळजी
अ. आपत्कालीन साहाय्यासाठी संबंधित यंत्रणांना संपर्क करतांना संक्षिप्तपणे विषय अथवा प्रसंग सांगावा. प्रसंग सांगत असतांना घडलेली घटना, तसेच घटना घडलेल्या अथवा घडत असलेल्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता, पीडित व्यक्तीचे नाव, अपराधी व्यक्तीचे नाव (ठाऊक असल्यास), घटनेची वेळ, घटनेचे अथवा गुन्ह्याचे स्वरूप, यंत्रणेकडून आवश्यक असलेले साहाय्य इत्यादी माहिती थोडक्यात सांगावी.
आ. त्या विभागातील ज्या व्यक्तीला आपण घटनेविषयी माहिती दिली, त्या व्यक्तीचे नाव, पद आणि अन्य आवश्यक माहिती विचारून घ्यावी. त्या वेळी आपल्याला स्वतःचे नाव सांगणे बंधनकारक नाही; मात्र या साहाय्य क्रमांकांचा दुरूपयोग होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसे झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आवश्यक असेल, तेव्हाच या क्रमांकावर संपर्क करावा.
३. शासकीय आणि अशासकीय संकेतस्थळांवर आपत्कालीन साहाय्य यंत्रणांची माहिती उपलब्ध !
प्रत्येक राज्य आणि जिल्हा यांनी त्यांचे शासकीय संकेतस्थळ सिद्ध केलेले आहे. या संकेतस्थळांवर त्या त्या यंत्रणांशी संबंधित आपत्कालीन साहाय्य संपर्क क्रमांक, पत्ता आणि अन्य माहिती उपलब्ध असते. तसेच indianhelpline.com या अशासकीय संकेतस्थळावरसुद्धा राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवरील आपत्कालीन साहाय्य यंत्रणांची माहिती उपलब्ध आहे.
४. अत्यावश्यक संपर्क क्रमांकांची नोंद नोंदवहीतही करावी !
प्रत्येकाने आपत्कालीन साहाय्य यंत्रणांचे हे संपर्क क्रमांक, तसेच संकेतस्थळांचे पत्ते आपल्याकडील नोंदवहीत नोंद करून ठेवावेत, जेणेकरून भ्रमणभाष बंद झाल्यास अथवा हरवल्यास आयत्या वेळी अडचण येणार नाही.
‘साधकांनो, आपत्काळात रक्षण होण्यासाठी आवश्यक ती पूर्वसिद्धता करून ठेवा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)